loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद सदस्याच्या कथित अपमानावरून गवळी समाज आक्रमक , विविध पक्ष कार्यकर्त्यांकडून निवेदन सादर

चिपळूण (ओंकार रेळेकर)खेड तालुक्यातील पोयनार येथे आयोजित धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांचा माजी मंत्री रामदास कदम यांनी अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकाराचे पडसाद आता चिपळूणमध्ये उमटू लागले असून, गवळी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने चिपळूण तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासह संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

५ नोव्हेंबर रोजी पोयनार येथे धरणाच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासनाच्या निमंत्रणानुसार जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाला. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम कार्यक्रमाला उपस्थित होते. बिरवटकर यांनी उशिरा येण्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी मंत्री योगेश कदम यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे, हा शासकीय कार्यक्रम असल्याने निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा परिषद सदस्य म्हणून अजय बिरवटकर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या निमंत्रणावरून उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देणे निषेधार्ह असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. हा प्रकार केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून संपूर्ण गवळी समाजाच्या अस्मितेला धक्का देणारा असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन रामदास कदम यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट आणि समस्त गवळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी ज्येष्ठ नेते एस. एम. तटकरे, नितीन ठसाळे, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, मनोज भोजने, सुभाष भोजने, अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, दिलीप माटे, विनोद खताते, अभिजित खताते, विलास वाजे, अजय भालेकर, उमेश महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रांतील गवळी समाजबांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg