loader
Breaking News
Breaking News
Foto

एआय तंत्रज्ञानाने उघड केले खुनाचे गूढ! अनोळखी कवटीवरून चेहरा साकारून रत्नागिरी पोलिसांनी परभणीतील हत्याकांडाचा लावला छडा

रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘रेड्स’ (RAIDS) ॲपच्या माध्यमातून रत्नागिरी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील एका अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर खून प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश मिळवले आहे. अनोळखी मृतदेहाच्या केवळ कवटीच्या रचनेवरून एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. या तांत्रिक तपासामुळे खुनाच्या गुन्ह्याला निर्णायक कलाटणी मिळाली असून, याप्रकरणी मृत तरुणाचे वडील आणि सख्खा भाऊ यांनाच अटक करण्यात आली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पाण्यात राहिल्याने मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणे परभणी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. तपासाची चक्रे थांबलेली असताना या प्रकरणात रत्नागिरी पोलीस दलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या एआय आधारित ‘रेड्स’ ॲपचा प्रभावी वापर करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून संबंधित अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेचा सखोल अभ्यास करून एआय तंत्रज्ञानाद्वारे त्या व्यक्तीच्या चेहऱ्याची प्रतिमा (फेस रिकन्स्ट्रक्शन) पुनर्रचित करण्यात आली. हे पुनर्रचित छायाचित्र विविध परिसरात प्रसारित करून स्थानिक पोलीस पाटलांच्या माध्यमातून गोपनीय माहिती संकलित करण्याचे मार्गदर्शन रत्नागिरी पोलिसांकडून परभणी जिल्हा पोलीस दलास करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या अचूक तांत्रिक प्रक्रियेमुळे अखेर त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत व्यक्तीचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असे निष्पन्न झाले. ओळख पटताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असता, या खुनामागे घरच्यांचाच हात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. परभणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृत गितारामचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. रत्नागिरी पोलीस दलाच्या या आधुनिक ‘रेड्स’ ॲपमुळे केवळ कवटीवरून चेहरा साकारून एका गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा उलगडा झाल्याने सर्वत्र या तांत्रिक कामगिरीचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg