loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबोलीत ‘न्यायसखी महिला व बाल अत्याचार निवारण समिती’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न!, महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कळंबोली : महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘न्यायसखी महिला व बाल अत्याचार निवारण समिती’चा भव्य उद्घाटन सोहळा कळंबोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्साहात पार पडला. समितीच्या अध्यक्षा ॲड. भूमिका जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या शुभहस्ते समितीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते प्रकाश बिनेदार, नगरसेविका लीना म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे, शिवसेना नेते बबनदादा पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवक्ते प्रा. मोहन गायकवाड, वाहतूक सेनेचे अध्यक्ष तथा भाजप नेते प्रभुदास भोईर, सुभाष गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल तालुकाध्यक्ष विजय पवार, भाजप नेते संतोष पाटील, ॲड. विवेक भोपी आणि समाजसेविका प्रेमाच्या आप्पा मॅडम यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांचा ‘न्यायसखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या अध्यक्षा ॲड. भूमिका जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, परिसरातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखणे, अन्यायग्रस्तांना योग्य मार्गदर्शन करणे आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे. या सामाजिक कार्यासाठी समिती कटिबद्ध असून, भविष्यात महाराष्ट्रासह देशभरात संस्थेचे कार्य विस्तारण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

महापौर नितीन पाटील यांनी ॲड. भूमिका जाधव यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. कमी वयात महिला व बालकांच्या न्यायासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगत, भविष्यात ही संघटना अधिक सक्षम होऊन समाजासाठी चांगले कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थित अन्य मान्यवरांनीही भूमिका जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून समितीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महिला व बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सुरू झालेल्या ‘न्यायसखी महिला व बाल अत्याचार निवारण समिती’च्या माध्यमातून भविष्यात अन्यायग्रस्तांना आधार मिळेल, अशी अपेक्षा या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg