loader
Breaking News
Breaking News
Foto

'ओंकार' हत्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करा; तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांची मागणी

​सावंतवाडी : गेल्या काही काळापासून विविध गावांच्या लोकवस्तीत फिरत असलेल्या 'ओंकार' नावाच्या हत्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंदाजे दोन वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांपासून व मूळ कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती सध्या स्वतंत्रपणे वावरत असून, नागरिकांची होणारी गर्दी आणि सेल्फीच्या नादात त्याच्या व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ओंकारच्या सुरक्षिततेसाठी व त्याच्या नैसर्गिक अधिवासात योग्य पुनर्वसनासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी तळकटचे माजी सरपंच तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचंद्र कृष्णा सावंत यांनी उपवनसंरक्षक, वनविभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या ओंकार एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेकजण त्याच्या जवळ जाऊन फोटो, सेल्फी व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असून, सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात त्याच्या नैसर्गिक वावरत अडथळा निर्माण होत आहे व त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. अशा गर्दीमुळे ओंकारच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला सुरक्षितपणे योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी अद्याप त्याला कायमस्वरूपी सुरक्षित व योग्य अधिवासात पोहोचवण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओंकार हा एक वन्यजीव असून, त्याचे नैसर्गिक जीवन जंगलात आणि त्याच्या योग्य अधिवासात असणे आवश्यक आहे. त्याला केवळ लोकांच्या मनोरंजनाचा साधन न समजता एक स्वतंत्र वन्यजीव म्हणून त्याच्या नैसर्गिक गरजा, सुरक्षितता व कल्याणाचा विचार होणे गरजेचे आहे. ओंकारच्या बाबतीत कोणतीही संघर्ष किंवा वाद निर्माण करायचा नसून, उलट माणूस आणि वन्यजीव यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व निर्माण व्हावे, हीच आमची अपेक्षा असल्याचे रामचंद्र सावंत यांनी स्पष्ट केले आहे. ​ओंकारच्या सध्याच्या परिस्थितीचा, आरोग्याचा, वर्तनाचा व त्याच्या नैसर्गिक गरजांचा तज्ज्ञांमार्फत सखोल अभ्यास करण्यात यावा. ​त्याला सुरक्षितपणे योग्य नैसर्गिक अधिवासात पोहोचवण्यासाठी तज्ज्ञ वन्यजीव अधिकारी व पशुवैद्यकीय पथकाच्या मदतीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. ​त्याचे मूळ कळप किंवा योग्य हत्तींच्या अधिवासाशी पुनर्मलन शक्य आहे का, याचाही तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यात यावा.

टाईम्स स्पेशल

​नागरिकांकडून होणारी गर्दी, पाठलाग, सेल्फी आणि व्हिडिओ चित्रिकरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. ​ओंकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून संबंधित गावांतील ग्रामपंचायती व नागरिकांना वेळेवेळी योग्य सूचना देण्यात याव्यात. ​ओंकारला कोणतीही इजा किंवा अनावश्यक त्रास न देता, शासनाच्या वन्यजीव संरक्षण नियमावली व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामानुसार त्याच्या दीर्घकालीन सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यात यावा, असे निवेदन वन विभागाला दिले आहे. यावेळी अश्विन गाड ,शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी दादा पाटील, महादेव राणे उपस्थित होते. ​आज ओंकार लोकवस्तीत फिरत असून, उद्या एखादी अनुचित घटना घडू नये व त्याच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी वेळीच योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत, वनविभागाने या विषयाला गांभीर्याने घेऊन ठोस कारवाई करावी आणि केलेल्या व प्रस्तावित कार्यवाहीची माहिती आम्हाला द्यावी, अशी विनंती रामचंद्र सावंत यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg