loader
Breaking News
Breaking News
Foto

काशिद समुद्रात LED लाईटने अवैध मासेमारी; दोन नौका जप्त

संगलट (प्रतिनिधी) - समुद्रात मासेमारी करण्यासाठी नियम आणि परवान्यांचे पालन करणे आवश्यक असताना विनानोंदणीकृत नौकेच्या माध्यमातून LED दिवे आणि जनरेटरच्या साहाय्याने मासेमारी करण्याचा प्रकार काशिदसमोरील समुद्रात उघडकीस आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने ९ आणि १२ नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाईत दोन नौका जप्त केल्या आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात LED साहित्य आणि जनरेटर हस्तगत करण्यात आल्याने रायगडच्या सागरी क्षेत्रातील अवैध मासेमारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समुद्रात LED दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करण्याचे प्रकार सुरू असल्याची पार्श्वभूमी असताना मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी गस्त वाढवली आहे. याच गस्तीदरम्यान काशिदसमोरील जलक्षेत्रात LED फोकस आणि जनरेटरच्या साहाय्याने मासेमारी करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या दोन नौका आढळून आल्या. विशेष म्हणजे, यापैकी एक नौका विनानोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सागरी क्षेत्रातील नौकांच्या नोंदणी आणि नियंत्रणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत नामदेव महादेव कावळे (रा. दिघी) यांच्या मालकीची ‘साईरत्न’ (नौका नोंदणी क्रमांक IND-MH-३-MM-4457) आणि हितेंद्र नरेश डबरी (रा. अलिबाग कोळीवाडा) यांच्या मालकीची विनानोंदणीकृत नौका ताब्यात घेण्यात आली. ‘साईरत्न’ नौकेवरून आठ LED फोकस, तीन पाण्याखालील दिवे आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला. तर विनानोंदणीकृत नौकेवरून १७ LED फोकस, दोन पाण्याखालील दिवे, तीन सायन लाइट आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही नौकांमधून एकूण २५ LED फोकस, पाच पाण्याखालील दिवे, तीन सायन लाइट आणि दोन जनरेटर हस्तगत करण्यात आले आहेत. दोन्ही नौका रेवदंडा येथील जेट्टीवर आणून जप्त करण्यात आल्या असून जप्त केलेले साहित्य सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ अन्वये संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई मत्स्यव्यवसाय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (योजना), सहआयुक्त मत्स्यव्यवसाय आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संरक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून भविष्यातील मच्छीमार पिढ्यांच्या उपजीविकेशी संबंधित बाब आहे. अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडू नये आणि समुद्रातील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत LED दिव्यांचा वापर करून होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात नियमित गस्त आणि कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg