loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गच्या भूमीत १७ मराठा रुईवा परिवाराचा ६४ वा रेजिंग डे उत्साहात संपन्न!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - १७ मराठा रुईवा परिवाराचा ६४ वा रेजिंग डे सोहळा रविवारी अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागांतून अधिकारी, आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच रुईवा परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात श्री गणपती स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर श्री त्रिंबोली माता देवीचे पूजन व माल्यार्पण करून देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. देशसेवेचा गौरवशाली इतिहास, सैनिकांचे बलिदान आणि परिवारातील एकात्मतेची भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली. या सोहळ्यातील सर्वांत भावनिक क्षण म्हणजे वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान. देशासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देताना उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सहभागी झालेले शहीद नायक गोविंद गावडे यांच्या पत्नी श्रीमती सत्यवती गावडे यांचा वीरपत्नी आणि श्रीलंका १९८८ मध्ये शहीद झालेले श्री रामचंद्र गावडे यांच्या पत्नी श्रीमती सीताबाई गावडे यांना विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग रुईवा परिवाराचे अध्यक्ष शशिकांत गावडे, दशरथ चव्हाण, विलास राणे उपस्थित होते. या सन्मानातून सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाचा कोकणच्या भूमीत सन्मान करून युवा पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवण्यात आले. तसेच परिवारातील ज्येष्ठ सदस्य, आजी-माजी सैनिक, सेवेत कार्यरत जवान आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोकणच्या समृद्ध लोककला आणि संस्कृतीचे सादरीकरण. पारंपरिक नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून कोकणच्या मातीचा सुगंध आणि परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडले. यामुळे कार्यक्रमाला विशेष सांस्कृतिक रंगत लाभली. कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या काही मान्यवरांनी व्हिडिओ संदेश व व्हॉइस मेसेजद्वारे शुभेच्छा पाठवून रुईवा परिवाराच्या आनंदात सहभाग नोंदवला. त्यांच्या शुभेच्छांचे संदेशही यावेळी उपस्थितांना ऐकविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद राणे आणि रेश्मा गुरुप्रसाद राणे यांनी अत्यंत प्रभावी, भावनिक आणि मुद्देसूद पद्धतीने केले. प्रत्येक सन्मान सोहळ्याला साजेशी शब्दरचना आणि कार्यक्रमातील विविध टप्प्यांचे सुंदर सादरीकरण यामुळे सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या नियोजनात भोजन व्यवस्थेलाही विशेष महत्त्व देण्यात आले होते. उपस्थितांसाठी स्वादिष्ट शाकाहारी भोजनासोबत अस्सल कोकणी माशांच्या पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती. त्यामुळे पाहुण्यांना कोकणच्या आदरातिथ्याचा मनमुराद आनंद घेता आला.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण कार्यक्रमाचे यश हे सिंधुदुर्ग रुईवा परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित ठरले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अधिकारी, ज्येष्ठ सदस्य आणि परिवारातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी मनापासून पार पाडली. परिवारातील एकजूट, सहकार्य आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित अधिकारी साहेबांनी तसेच मान्यवरांनी सिंधुदुर्ग परिवाराने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. सर्वांनी एकत्र येऊन जबाबदारी स्वीकारल्यास कोणताही मोठा कार्यक्रम यशस्वी करता येतो, याचा प्रत्यय या रेजिंग डे सोहळ्यातून आला. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर समीर चव्हाण आणि कर्नल किशोर भागवत प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर राणे उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहदेव राऊळ यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उपस्थित राहून सहकार्य करणारे सर्व अधिकारी, ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सैनिक, महिला भगिनी, युवक आणि रुईवा परिवारातील सर्व सदस्य यांचे सिंधुदुर्ग रुईवा परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले. सिंधुदुर्ग रुईवा परिवारातर्फे दौलत सुतार, अमित सुर्वे, संजय राऊळ, रवींद्र कुंदेकर, रमेश निवळे, वासुदेव दळवी, संजय तारी, चंद्रहास यादव, दीपक बागवे, शंकर नाईक, अशोक कडव, कांता सावंत व इतर सर्वांनी या कार्यक्रमात विशेष सहकार्य दिले. “कार्यक्रम संपला, पण आठवणी कायम राहतील; सन्मान संपला, पण आपुलकी कायम राहील आणि १७ मराठा रुईवा परिवाराची एकजूट अशीच सदैव टिकून राहील,” या भावनेने ६४ वा रेजिंग डे सोहळा उत्साहात आणि अविस्मरणीय आठवणींसह संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg