loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईत ६०० नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याचे धडे

नवी मुंबई : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी नेहमीच डॉक्टर किंवा रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध असतील असे नाही. अशावेळी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जसे की, एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली किंवा हृदयाचे कार्य बंद पडल्यास काय करावे, याचे ज्ञान असेल तर संकटाच्या क्षणी त्या व्यक्तीसाठी मोठा आधार ठरतो. याच उद्देशाने इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या (आयएससीसीएम) मुंबई शाखेतर्फे वाशी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे ६०० नागरिकांना सीपीआर आणि प्राथमिक जीवनरक्षक तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय क्रिटिकल केअर दिनानिमित्त ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून आयएससीसीएमच्या ३३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यंदाची संकल्पना ‘क्रिटिकल केअर अ‍ॅट द कम्युनिटी डोअरस्टेप’ अशी होती. म्हणजेच अतिदक्षता उपचारांची माहिती आणि जीवनरक्षक कौशल्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘कोड लाइफ : लर्न इट, सेव्ह इट, प्रोटेक्ट इट’ या संदेशातून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी मदत करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. भारतात हृदयाचे कार्य बंद पडलेल्या रुग्णांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून तातडीने सीपीआर मिळण्याचे प्रमाण कमी असल्याचे काही अभ्यासांतून समोर आले आहे. २०२१ मध्ये ‘इंडियन हार्ट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात रुग्णालयाबाहेर हृदय बंद पडलेल्या २०५ रुग्णांपैकी केवळ ९.८ टक्के रुग्णांना उपस्थित नागरिकांकडून सीपीआर देण्यात आल्याचे आढळले. तसेच २०१७ मधील उत्तर भारतातील एका अभ्यासात ८० रुग्णांपैकी केवळ १.३ टक्के रुग्णांना घटनास्थळी सीपीआर मिळाल्याचे नोंदविण्यात आले. या अभ्यासांमध्ये बहुतांश घटना घरात घडल्याचेही दिसून आले. हे निष्कर्ष संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत नसले, तरी कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित करतात.

टाईम्स स्पेशल

या प्रशिक्षण कार्यक्रमात पक्षाघाताची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, अवयवदानाबाबत जनजागृती व अवयवदानाची प्रतिज्ञा, प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) जबाबदारीने वापर करून औषधांना प्रतिकार करणार्‍या जंतूंचा धोका कमी करणे तसेच प्रौढांसाठी आवश्यक लसीकरण अद्ययावत ठेवणे या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. घरात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी अचानक उद्भवणार्‍या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना योग्य पद्धतीने मदत करता यावी, यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ‘कोड लाइफ’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जीवनरक्षक कौशल्यांविषयी जागरूकता निर्माण करून आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg