loader
Breaking News
Breaking News
Foto

भात कापणी, नाचणी कापणीला वेग; संगमेश्वरात सर्पदंश-विंचूदंशाच्या घटनांत वाढ, पाच महिन्यांत ७२ सर्पदंश, ४९ विंचूदंशाच्या रुग्णांची नोंद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात सध्या भात कापणी आणि नाचणी कापणीच्या कामांना वेग आला असून, शेतशिवारात शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मात्र, शेतीची कामे करताना सर्पदंश आणि विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७२ जणांना सर्पदंश, तर ४९ जणांना विंचूदंश झाला आहे. याशिवाय श्वानांनीही अनेकांना चावा घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतात काम करताना शेतकर्‍यांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. भातशेतीबरोबरच नाचणी आणि वायंगणी शेतीही केली जाते. पेरणी, निंदणी आणि कापणीच्या कामांसाठी शेतकर्‍यांना शेतात, बांधावर तसेच गवताळ भागात जावे लागते. अशा ठिकाणी साप आणि विंचू आढळण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकर्‍यांना दंशाच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात १५, मे महिन्यात ८, जूनमध्ये २०, जुलैमध्ये १४ आणि ऑगस्टमध्ये १५ जणांना सर्पदंश झाला आहे. अशा प्रकारे पाच महिन्यांत एकूण ७२ सर्पदंशाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जून महिन्यात सर्वाधिक २० रुग्ण आढळले आहेत. विंचूदंशाच्या घटनाही लक्षणीय आहेत. एप्रिलमध्ये ९, मेमध्ये १५, जूनमध्ये १४, जुलैमध्ये ३ आणि ऑगस्टमध्ये ८ जणांना विंचूदंश झाला. या पाच महिन्यांत एकूण ४९ जणांना विंचूदंश झाल्याची नोंद आहे. याशिवाय एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत श्वानांनी ३८ जणांना चावा घेतला आहे. पावसाळ्यात तसेच शेतीच्या पेरणी आणि कापणीच्या हंगामात सर्पदंशाच्या घटनांचा धोका वाढतो. सध्या भात आणि नाचणी कापणीची कामे सुरू असल्याने शेतकर्‍यांनी शेतात जाताना पायात बूट किंवा जाड पादत्राणे वापरणे, गवत किंवा लाकडाच्या ढिगार्‍यात हात घालण्यापूर्वी काळजी घेणे आणि अंधारात पुरेशा प्रकाशाचा वापर करणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

साप चावल्यास झाडपाल्याचे उपचार, मंत्र-तंत्र किंवा इतर घरगुती उपायांवर वेळ न घालवता तातडीने रुग्णालयात दाखल करणे महत्त्वाचे आहे. दंश झालेल्या व्यक्तीला शक्य तितके शांत ठेवून हालचाल कमी करावी. दंशाच्या जागी घट्ट दोरी बांधणे, जखम कापणे किंवा विष शोषण्याचा प्रयत्न करणे टाळावे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश आणि विंचूदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी दिली. तसेच सर्पदंश आणि विंचूदंशावरील उपचारांसाठी आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या भात आणि नाचणी कापणीच्या कामांना वेग आला असताना शेतकर्‍यांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. शेतीची कामे करताना योग्य खबरदारी घेतल्यास सर्पदंश आणि विंचूदंशाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg