loader
Breaking News
Breaking News
Foto

२६ वर्षांची अखंड श्रद्धा... मित्राच्या विजयाचा नवस फेडण्यासाठी कोल्हापूरहून तुरंबवला धाव!

चिपळूण (ओंकार रेळेकर) - श्रद्धा ही केवळ मनात असते, पण जेव्हा त्या श्रद्धेला नवसाची आणि भक्तीची जोड मिळते, तेव्हा ती किती विलक्षण असू शकते, याचा प्रत्यय चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील श्री शारदादेवी देवस्थानात आला. शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांचे ग्रामदैवत असलेल्या तुरंबवच्या श्री शारदादेवीवर कोल्हापूरचे माजी महापौर तथा ऑल टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे राज्याध्यक्ष सागर चव्हाण यांची अपार श्रद्धा आहे. गेल्या तब्बल २६ वर्षांपासून ते दरवर्षी न चुकता देवीच्या दर्शनासाठी तुरंबव येथे येतात. वर्षानुवर्षे जपलेली ही श्रद्धा त्यांच्या भक्तिभावाची साक्ष देणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांचे गेल्या ४० वर्षांपासूनचे जिवलग मित्र अजित पाटील उमेदवार होते. अजित पाटील विजयी झाले, तर त्यांना सोबत घेऊन तुझ्या दर्शनाला येईन, असा नवस सागर चव्हाण यांनी देवीचरणी केला होता. अजित पाटील निवडणुकीत विजयी झाले आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी सागर चव्हाण यांनी आज त्यांना सोबत घेऊन तुरंबव गाठले. दर्शनानंतर कोल्हापूरकडे परतत असताना चिपळूण येथील आमदार भास्करराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांना आमदारांची गाडी दिसली. केवळ गाडी पाहून त्यांनी आमदारांची भेट घेण्याचे ठरवले. त्यांनी स्वतःची ओळख करून देत शारदादेवीवरील आपली श्रद्धा, २६ वर्षांची अखंड दर्शनपरंपरा आणि मित्राच्या विजयासाठी केलेला नवस व तो पूर्ण करण्यासाठी केलेला प्रवास याची संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली.

टाईम्स स्पेशल

हा सारा घटनाक्रम ऐकून आमदार भास्करराव जाधव भारावून गेले. आपल्या ग्रामदैवताची महती केवळ कोकणापुरती मर्यादित नसून कोल्हापूरसारख्या दूरच्या भागातही तिचे भक्त किती निष्ठेने जोडलेले आहेत, याची त्यांना पुन्हा एकदा प्रचीती आली. अनपेक्षितपणे घडलेली ही भेट त्यांच्या दृष्टीनेही भावनिक आणि आनंददायी ठरली. यावेळी आमदार जाधव यांनी सागर चव्हाण आणि अजित पाटील या दोघांचाही सन्मान करून त्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा गौरव केला तर चव्हाण यांनी देखील त्यांना दोन पुस्तके भेट स्वरूपात दिली. २६ वर्षांची अखंड भक्ती, ४० वर्षांची मैत्री आणि मित्राच्या विजयासाठी देवीचरणी केलेला नवस... या तीन भावबंधांचा सुंदर संगम आज तुरंबवच्या शारदादेवीच्या साक्षीने अनुभवायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg