loader
Breaking News
Breaking News
Foto

पितृछत्र हरपले, आईनेच केला सांभाळ! गरिबीवर मात करीत खाकी वर्दीत झळकली नारीशक्तीची रणरागिणी नेत्रा कामेरकर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - नवरात्रोत्सव म्हणजे केवळ नऊ दिवस देवीची पूजा-अर्चा, आरती आणि भक्तीचा जागर नव्हे; तर अन्याय, संकटे, गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून स्वतःच्या कर्तृत्वाचा भगवा फडकवणार्‍या नारीशक्तीचा गौरव करण्याचे पर्व आहे! ज्या आदिशक्तीने महिषासुराचा संहार करून धर्माचे रक्षण केले, त्याच शक्तीचे दर्शन आज समाजातील अशा असंख्य महिलांच्या संघर्षातून घडते, ज्या संकटांसमोर गुडघे टेकण्याऐवजी त्यांच्याशी दोन हात करतात. कोणाच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नसते, कोणाच्या वाट्याला गरिबीचे चटके येतात, तर कोणाला परिस्थितीशी झुंज देत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे लागते. मात्र, या सार्‍या संकटांवर मात करत जेव्हा एखादी महिला खाकी वर्दी परिधान करून समाजाच्या रक्षणासाठी उभी राहते, तेव्हा तिच्या कर्तृत्वात साक्षात दुर्गेच्या शौर्याचे दर्शन घडते. अशाच जिद्दीची, त्यागाची, संघर्षाची आणि अभिमानास्पद कर्तृत्वाची कहाणी आहे रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि सध्या देवरूख पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या नेत्रा सचिन कामेरकर यांची! बालपणीच वडिलांचे छत्र हरपले, घरात गरिबीने पाय रोवले, आयुष्याने कोवळ्या वयातच संघर्षाची परीक्षा घेतली; परंतु या परिस्थितीपुढे नेत्रा यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आई, कबड्डीच्या मैदानावर गाजवलेले कर्तृत्व, पोलीस सेवेत केलेली १९ वर्षांची वाटचाल आणि संसार सांभाळत पार पाडलेले कर्तव्य, या प्रत्येक टप्प्यातून एका रणरागिणीचे असामान्य व्यक्तिमत्त्व उलगडते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बालपण म्हणजे आई-वडिलांच्या मायेच्या सावलीत बागडण्याचे, वडिलांच्या हाताला धरून जग अनुभवण्याचे आणि स्वप्नांच्या रंगांनी आयुष्य सजवण्याचे वय! मात्र, नेत्रा कामेरकर यांच्या आयुष्यात नियतीने अगदी लहान वयातच दुःखाचा डोंगर उभा केला. त्या अवघ्या दुसरीच्या वर्गात शिकत असतानाच त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे वडील शरद ऊर्फ बाळ धामणस्कर हे जिल्ह्यातील नामवंत आणि उत्कृष्ट कॅरमपटू म्हणून परिचित होते. अशा कर्तृत्ववान वडिलांचा आधार अकाली हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या वयात मुलीला वडिलांच्या आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात नेत्रा यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा आधार कायमचा निघून गेला. वडिलांच्या आठवणी मनात साठवून पुढे चालण्याची वेळ त्यांच्यावर आली. एका बाजूला वडिलांच्या विरहाची वेदना आणि दुसर्‍या बाजूला आर्थिक अडचणींनी घेरलेले जीवन, अशा दुहेरी संकटांत त्यांचे बालपण गेले. परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे केले; परंतु या प्रश्नांची उत्तरे शोधताना नेत्रा यांच्यातील जिद्द अधिकाधिक बळकट होत गेली.वडील नव्हते, परिस्थिती अनुकूल नव्हती, गरिबीचा विळखा होता; पण स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द मात्र जिवंत होती! याच जिद्दीने नेत्रा यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली.

टाईम्स स्पेशल

नेत्रा यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करताना त्यांच्या आईच्या त्यागाला आणि कष्टांना विसरून चालणार नाही. पतीच्या निधनानंतर स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मुलीच्या भवितव्याची जबाबदारी उचलणार्‍या त्या माउलीचा संघर्ष हा या संपूर्ण कहाणीचा आत्मा आहे. पतीचे छत्र हरपल्याचे दुःख मनात असतानाही तिने लेकीसमोर परिस्थितीपुढे शरणागती पत्करली नाही. स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू लपवून मुलीच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या वेदना मनात दडवून लेकीच्या भविष्याची चिंता केली.आईने केवळ आईची माया दिली नाही, तर वडिलांच्या अनुपस्थितीत आवश्यक असलेला खंबीर आधारही दिला. मुलीच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि तिला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तिने कष्टांची पराकाष्ठा केली. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मुलीच्या स्वप्नांना तडा जाऊ द्यायचा नाही, हा जणू तिचा ध्यास होता. आईच्या त्यागाची ही कहाणी म्हणजे नारीशक्तीच्या सामर्थ्याचा खरा वस्तुपाठ! कारण एखादी मुलगी यशाच्या शिखरावर पोहोचते, तेव्हा तिच्या कर्तृत्वामागे अनेकदा आईने गुपचूप सोसलेल्या वेदना, केलेले कष्ट आणि दिलेला आत्मविश्वास उभा असतो. नेत्रा यांच्या आयुष्यातही त्यांच्या आईने निभावलेली ही दुहेरी भूमिका अत्यंत मोलाची ठरली. नवरात्रोत्सवात आपण आदिमायेच्या चरणी नतमस्तक होतो; पण आपल्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणार्‍या अशा माउलीच्या रूपातही आदिशक्तीचे दर्शन घडते. नेत्रा यांच्या यशाचा पाया त्यांच्या आईने आपल्या कष्टांनी आणि त्यागाने घातला, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg