loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर बोलेरोला ट्रेलरची धडक, दोन्ही वाहने दरीत कोसळलीहातखंबा महामार्ग पोलिसासह तिघांचा मृत्यू

रत्नागिरी, दि. १ नोव्हेंबर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा नजीक अंजनारी पुलाजवळ तीव्र वळणाच्या उतारावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या २२ टायर ट्रेलरने महामार्ग वाहतूक पोलिसांच्या सरकारी बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथे कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. बोलेरोमधील पोलीस कर्मचारी अनिल अशोक शिंगाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंजनारी घाटाखालील पुलाजवळ नदीपात्रात एक वाहन कोसळून अपघात झाल्याची माहिती लांजा पोलीस ठाण्याकडून महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखांबा येथे देण्यात आली होती. या अपघाताची खातरजमा करण्यासाठी ASI संतोष गायकवाड आणि पोलीस कर्मचारी अनिल शिंगाडे हे सरकारी बोलेरो जीपमधून घटनास्थळी रवाना झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास अंजनारी पुलाच्या सुमारे १०० मीटर आधी, तीव्र वळणाच्या उतारावर मागून येणाऱ्या RJ/09/GE/2397 क्रमांकाच्या २२ टायर ट्रेलरने सरकारी बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रेलर चालकाने रस्त्याची परिस्थिती आणि तीव्र वळण लक्षात न घेता भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर सरकारी बोलेरो जीप रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ASI संतोष गायकवाड आणि पोलीस कर्मचारी अनिल शिंगाडे जखमी झाले. दोघांनाही प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे ASI संतोष गायकवाड यांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी पोलीस कर्मचारी अनिल शिंगाडे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी आयसीयू सुविधायुक्त रुग्णवाहिकेतून सांगली येथे नेण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, बोलेरोला धडक दिल्यानंतर ट्रेलरही रस्त्याच्या डाव्या बाजूला दरीत कोसळून पलटी झाला. या अपघातात ट्रेलरचा चालक केबिनखाली अडकला होता. त्याला गंभीर अवस्थेत रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचाही मृत्यू झाला. तसेच ट्रेलरमध्ये अडकलेल्या क्लिनरचा मृत्यू झाल्याची माहिती रविवारी सकाळी समोर आली. या अपघातात महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम, लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक बळवंत पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg