loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश!

सावर्डे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेसह विविध सामाजिक सहाय्य योजनांसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरण्याच्या निर्णयामुळे राज्यातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, चिपळूण तालुका संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष तथा सावर्डे गटाचे पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर यांच्या प्रयत्नांनाही यश मिळाले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाने २७ मार्च २०२६ रोजी लागू केलेल्या सुधारित तरतुदींनुसार संबंधित योजनांसाठी वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला किंवा जन्मदाखला सादर करण्याची अट होती. मात्र, ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींकडे हे दस्तऐवज उपलब्ध नसल्याने त्यांना योजनांचे प्रस्ताव सादर करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. केवळ आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र लाभार्थी शासकीय अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही समस्या लक्षात घेऊन चिपळूण तालुका संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष शौकत माखजनकर यांनी हा महत्त्वाचा विषय आमदार शेखरजी निकम यांच्या निदर्शनास आणून दिला. लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती मिळताच आमदार निकम यांनी तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांची व्यथा मांडून वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्याची मागणी केली आणि यासंदर्भात निवेदनही सादर केले.या पाठपुराव्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी शाळेचा दाखला व जन्मदाखला यांची सक्तीची अट शिथिल करून आधार कार्ड ग्राह्य धरण्याबाबत संबंधित निकषांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन यांसारख्या योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या विविध वंचित घटकांना मिळतो. याशिवाय परित्यक्ता, घटस्फोटित महिला, अत्याचारग्रस्त महिला आणि विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या पात्र व्यक्तींसाठीही शासनाच्या विविध विशेष सहाय्य योजना राबविण्यात येतात.वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरण्याच्या निर्णयामुळे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना योजनांसाठी अर्ज करणे अधिक सुलभ होईल.

टाइम्स स्पेशल

या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांना दिलासा मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांचे चिपळूण तालुका संजय गांधी योजना समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले. गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या अडचणी दूर होणे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील पात्र नागरिकांना होणार असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेला बळ मिळण्यास मदत होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg