loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाव नसले तरी लाभ मिळणार! अदिती तटकरे यांची माहिती

म्हसळा : महिला शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाव नसले, तरी त्यांना योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शिवनेरी महिला प्रभाग संघ, पाभरे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराष्ट्र महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, स्वयं-सहायता समूहांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि महिलांनी स्वावलंबी बनावे, यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा देत अदिती तटकरे यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता प्रत्येकाने पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमप्रसंगी अदिती तटकरे यांच्या हस्ते चार स्वयं-सहायता समूहांना बँक कर्जाची प्रमाणपत्रे, तर तीन स्वयं-सहायता समूहांना समुदाय गुंतवणूक निधीचे वितरण करण्यात आले. तसेच महालक्ष्मी सरस आणि रायरी सरस प्रदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या स्वयं-सहायता समूहांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सभापती बबन मनवे, उपसभापती लहू म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, अनिल बसवत, गटविकास अधिकारी मंगेश साळी, पंचायत समिती सदस्य समृद्धी चाचले, तालुका अभियान व्यवस्थापक रोहिणी निलेकर, मयुरी जांभलेकर, ज्ञानेश्वर गोरटे आणि लीना चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वयं-सहायता समूहांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने ही वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वपूर्ण ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg