loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री मृतावस्थेत आढळलेल्या मादी बिबट्याच्या मृत्यूचे गूढ उलगडले; वाहनाची धडक नव्हे, सर्पदंश ठरला मृत्यूचे कारण!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - नजरेत भक्ष्य टिपण्याची ताकद, पावलांत वीजेचा वेग आणि दबा धरून शिकार करण्याची अफलातून कला. ज्या बिबट्याच्या चाहुलीने जंगलातील इतर प्राण्यांची पळापळ उडते, त्याच बिबट्याच्या आयुष्याचा शेवट एका विषारी सापाच्या दंशाने व्हावा, हा निसर्गाचा किती अनपेक्षित आणि काळजाला चटका लावणारा खेळ! दुसऱ्याची शिकार करण्यासाठी जंगलात भटकणारी मादी बिबट्याच अखेर सर्पदंशाची शिकार ठरली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या या बिबट्याच्या मृत्यूमागील सत्य शवविच्छेदन अहवालातून समोर आल्यानंतर परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळवली ते तुरळदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. रात्रीच्या अंधारात महामार्गावर पडलेल्या या वन्यजीवाला पाहून प्रवाशाच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्षणाचाही विलंब न करता त्याने वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जंगलातील चपळ शिकारीचा जीवनप्रवास तोपर्यंत संपला होता. मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी साडवली येथे नेण्यात आले. महामार्गाच्या मध्यभागी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होत होती. मात्र, प्रत्यक्ष शवविच्छेदनानंतर या घटनेचे चित्रच बदलले. साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बिबट्याच्या शरीरावर वाहनाच्या धडकेच्या ठळक खुणा आढळल्या नाहीत. शरीरातील अवयवही सुस्थितीत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. अखेर शवविच्छेदन अहवालात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.ज्या महामार्गावर मृतदेह आढळला, त्याच महामार्गावरील वाहन अपघाताची शक्यता सुरुवातीला चर्चेत होती; पण मृत्यूचे खरे कारण विषारी सापाचा दंश असल्याचे स्पष्ट झाल्याने या घटनेने अनपेक्षित वळण घेतले.

टाईम्स स्पेशल

बिबट्या हा केवळ एक वन्यप्राणी नाही, तर जंगलातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. त्याची शिकार करण्याची क्षमता, चपळाई आणि नैसर्गिक ताकद यामुळे त्याला जंगलातील प्रभावी शिकारी मानले जाते. मात्र, निसर्गाच्या दरबारात कोणताही जीव कायमचा बलाढ्य नसतो, हे या घटनेने दाखवून दिले आहे.शिकारीच्या शोधात बाहेर पडलेला बिबट्या स्वतःच मृत्यूच्या सापळ्यात अडकला. ज्याच्या नजरेतून भक्ष्य सुटत नाही, त्यालाच विषारी सर्पाच्या दंशाने जीव गमवावा लागला. ही बाब जितकी आश्चर्यकारक आहे, तितकीच हळहळ व्यक्त करायला लावणारी आहे. जंगलात प्रत्येक जीवाचा संघर्ष सुरू असतो; मात्र त्या संघर्षाचा शेवट कधी, कुठे आणि कसा होईल, हे निसर्गालाच ठाऊक. जंगलात दुसऱ्याचा जीव घेऊन स्वतःचे पोट भरणारा शिकारीही कधी दुसऱ्याच्या विषाचा बळी ठरू शकतो, याची जाणीव या घटनेने करून दिली. महामार्गावर पडलेले बिबट्याचे ते निश्चल शरीर, सुरुवातीला व्यक्त झालेला अपघाताचा अंदाज आणि अखेर सर्पदंशातून उलगडलेले मृत्यूचे सत्य... या संपूर्ण घटनेने निसर्गातील जीवन-मृत्यूचे चक्र किती अनिश्चित आहे, हे अधोरेखित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg