loader
Breaking News
Breaking News
Foto

देवीला मिळतेय जिवंत रूप..! युवा रांगोळीकार विलास राहटे रंगकामात रमले

·देवळे (प्रकाश चाळके) : गणरायाच्या निरोपाने डोळ्यांच्या कडा ओलावल्या असतानाच आता कोकणच्या मातीत नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. गावागावांतील मंदिरांमध्ये, मंडळांच्या ठिकाणी आणि चित्रशाळांमध्ये आदिमायेच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. कुठे मंडप उभारले जात आहेत, कुठे सजावटीची लगबग सुरू आहे, तर चित्रशाळांमध्ये मातीच्या मूर्तींमध्ये देवीचे तेज उतरविण्यासाठी कलाकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. धामणी येथील अनंत चित्रशाळेत सध्या असेच भक्तिमय आणि कलामय वातावरण अनुभवायला मिळत आहे. नवरात्रोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्ती आता अंतिम टप्प्यात असून, देवीच्या रूपाला शेवटचा साज चढविण्याचे काम सुरू आहे. या रंगकामात युवा रांगोळीकार विलास राहटे अक्षरशः रमून गेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हातात कुंचला... समोर देवीची मूर्ती... आणि डोळ्यांसमोर केवळ एकच ध्यासदेवीचे रूप अधिकाधिक जिवंत दिसावे! देवीच्या चेहर्‍यावर रंगांची पहिली छटा उमटते आणि हळूहळू तिच्या डोळ्यांत भाव उतरू लागतात. कपाळावरचे कुंकू, डोळ्यांतील करारीपणा, चेहर्‍यावरचे तेज, ओठांवरील प्रसन्नता आणि अलंकारांना दिलेला उठाव... प्रत्येक बारकाव्यावर विलास राहटे अत्यंत बारकाईने काम करताना दिसतात. त्यांच्या कुंचल्याचा प्रत्येक फटका जणू देवीच्या रूपाला नवा श्वास देत असल्याचा भास होतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी जेव्हा हीच देवी सजून-धजून भक्तांसमोर विराजमान होईल, तेव्हा तिच्या तेजस्वी रूपामागे चित्रशाळेत शांतपणे घाम गाळणार्‍या या कलाकारांच्या मेहनतीची कहाणीही तितकीच सुंदर असेल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg