loader
Breaking News
Breaking News
Foto

ती ‘एआय’ क्लिप नव्हे, भाजपचीच स्क्रिप्ट! ५०० कोटींच्या आरोपाबाबत रामदासभाई कदमांचा मित्रपक्षावरच निशाणा

मुंबई, (प्रतिनिधी) - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्याने शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी थेट मित्रपक्ष भाजपवरच तोफ डागली आहे. ती क्लिप एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्राच्या साहाय्याने बनवलेली) नसून त्यातील संभाषण करणारे सर्व लोक भाजपचेच आहेत, असा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत सुमारे ३२ मिनिटांची एक जुनी कॉन्फरन्स कॉल ऑडिओ क्लिप ऐकवली. या कथित क्लिपमध्ये तीन ते चार व्यक्तींचे संभाषण असून, एक महिला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याचा दावा करत असल्याचे ऐकू येते. या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ऑडिओ क्लिपवरून ना. एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले जात असताना रामदासभाई कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रामदासभाई कदम म्हणाले की, या क्लिपमध्ये ३२ मिनिटे चर्चा करणारे सर्व लोक भाजपचेच आहेत. भाजप पक्ष कसा वाढवायचा, यावरच त्यात ३० मिनिटे चर्चा सुरू आहे. स्वतःच्या पक्षात चर्चा करायची आणि खापर शिवसेनेवर फोडायचे, हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. ही कथित ऑडिओ क्लिप ऑक्टोबर २०२४ मधील म्हणजेच सुमारे दोन वर्षांपूर्वीची आहे, याकडे कदमांनी लक्ष वेधले. जर ही क्लिप २ वर्षांपूर्वीची आहे, तर इतके दिवस ती का लपवून ठेवली? आत्ताच ती बाहेर का काढण्यात आली? असा सवाल उपस्थित करत, ना. एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठीच हा सर्व खेळ रचला गेल्याचा घणाघाती आरोप कदम यांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करतानाच रामदासभाई कदम यांनी जरांगे यांना प्रति-इशारा दिला आहे. क्लिपमधील ती महिला कोण आहे आणि तिच्याकडे ५०० कोटींचा हिशोब कुठून आला, याचा शोध घ्यावा. माझ्याकडेही जरांगेंच्या एका गुप्त बैठकीची क्लिप आहे, ज्यात भाजपचे आमदार बसलेले आहेत आणि जरांगे स्वतःच्याच सहकार्‍यांना शिंदेंचे चमचे म्हणत आहेत. वेळ आल्यास ती क्लिपही मी बाहेर काढेन, असा इशारा कदम यांनी दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण ऑडिओ क्लिप प्रकरणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित क्लिपची ’फॉरेन्सिक तपासणी’ करण्याचे आदेश दिले आहेत. या क्लिपमागील सत्य आणि सूत्रधार कोण, हे लवकरच तपासातून समोर येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनीदेंखील दोन - अडीच वर्षांपुर्वीची ही क्लिप आत्ताच कशी आली असा सवाल केला आहे. मात्र, रामदासभाई कदमांच्या या थेट आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg