loader
Breaking News
Breaking News
Foto

मार्कंडीतील अनधिकृत कंटेनर हटवा; अन्यथा २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण!

चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरात नियोजित २४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी कंटेनर व बांधकाम हटविण्याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने यतीन अमरनाथ कोवळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले नाही, तर संविधान दिनी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील स्थलांतरित नगर परिषद कार्यालयासमोर सहकुटुंब व नागरिक यांच्यासह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी नगर पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कोवळे कुटुंबीयांच्या मालकीची मार्कंडी येथील सर्व्हे नं. ५९/२क तसेच सिटी सर्व्हे नं. २६३३अ, २६३४, २६३५ आणि २६३६ मधील ८५ चौ. मीटर जागा शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित आहे. एप्रिल २०२० मध्ये नगर परिषदेने या जागेवरील अनधिकृत खोके हटवून ती मोकळी केली होती. मात्र, ३१ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याच जागेवर ४५ बाय १५ फूट आकाराचे आणि पाच रोलिंग शटर असलेले लोखंडी कंटेनर आणून ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कंटेनरखाली नोव्हेंबर महिन्यात चिऱ्यांचे पक्के जोते बांधण्याचे काम सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय लगतच्या साई दर्शन अपार्टमेंटमधील काही गाळेधारकांनी वाढीव बांधकाम करून मार्ग अडविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अतिक्रमणाबाबत यतीन कोवळे यांनी ३१ जुलै, ३ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट २०२६ रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ११ व १३ ऑगस्ट रोजी प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून सात दिवसांच्या आत कंटेनर स्वखर्चाने हटविण्याचे आदेश दिले होते. मुदतीत कंटेनर न हटविल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे लेखी आश्वासनही मुख्याधिकारी यांनी तक्रारदार कोवळे यांना दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने तक्रारदार यतीन कोवळे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ११ सप्टेंबर २०२६ रोजी नगर रचना विभागाने संबंधित रेडिमेड स्ट्रक्चर अनधिकृत व विनापरवाना असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले होते. असे असतानाही अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तक्रारदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टाईम्स स्पेशल

स्थानिक नगरसेवक तथा पाणी पुरवठा समिती सभापती निहार कोवळे यांनीही या अतिक्रमणाबाबत नगराध्यक्षांशी चर्चा करून कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यतीन कोवळे यांनी केली आहे. या आमरण उपोषणाचे निवेदन कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, चिपळूण तहसीलदार आणि चिपळूण पोलीस निरीक्षक यांनाही सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन २५ नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार की मार्कंडीतील या प्रश्नावरून २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg