loader
Breaking News
Breaking News
Foto

रिल्सच्या दुनियेतून रूपेरी पडद्यावर झळकली देवगडची 'सलोनी', 'गमन'मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

देवगड- (प्रतिनिधी) - सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची आणि कलागुणांची छाप उमटवत थेट रुपेरी पडद्यापर्यंत मजल मारणाऱ्या देवगड तालुक्यातील गढीताम्हाणे येथील युवा कलाकार सलोनी संजय कदम यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सोशल मीडियावरील रिल्स हेच त्यांच्या अभिनय प्रवासातील महत्त्वाचं माध्यम ठरलं असून याच माध्यमातून त्यांना 'गमन' या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील एका युवा कलाकाराने आपल्या कलागुणांच्या जोरावर मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर झळकणं ही गढीताम्हाणेसह देवगड तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनोज नाईक-साटम लिखित व दिग्दर्शित आणि मानसी नाईक-साटम निर्मित 'गमन' हा मराठी कौटुंबिक भावनिक चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. एक तास ४६ मिनिटांच्या या चित्रपटातून कोकणातून रोजगाराच्या शोधात शहरांकडे होणारं स्थलांतर, त्यातून निर्माण होणारा कौटुंबिक संघर्ष, गावाशी असलेलं नातं आणि मातीपासून दूर जाताना मनात निर्माण होणारी भावनिक घालमेल यांचं संवेदनशील चित्रण करण्यात आलं आहे. कोकणातील हिरवाई, लाल माती, कौलारू घरं आणि ग्रामीण संस्कृती यासोबतच स्थलांतरामुळे गावांमध्ये निर्माण होणारा ओसाडपणा हा चित्रपटाचा महत्त्वाचा विषय आहे. या चित्रपटात नारायण जाधव, श्रद्धा खानोलकर, हर्षिका मेळेकर, सचिन वळंजू आणि दीपक कुमार यांच्यासह इतर कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये सचिन वळंजू यांनी 'पाशा' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून पाशाच्या पत्नीची भूमिका सलोनी कदम यांनी केली आहे. छोट्या भूमिकेतून का होईना, पण मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळणं हा आपल्यासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला असल्याचे सलोनी कदम यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

'गमन' चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई व कोकणातील देवगड तालुक्यातील नारिग्रे परिसरात करण्यात आले आहे. चित्रपटाची कथा कोकणातील गाव आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांभोवती फिरत असल्याने दोन्ही परिसरातील दृश्यांचे प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (PIFF) मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झाली होती. तसेच थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला कथेसाठी विशेष ज्युरी सन्मान मिळाला आहे. सलोनी कदम या देवगड येथील स. ह. केळकर कॉलेज येथे एमए पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्या प्रोफेशनल मेहंदी आर्टीस्ट आहेत. यापूर्वी त्यांनी काही नाटकांमध्ये रंगभूषा, वेषभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. सलोनी कदम युथ फोरम- देवगड संस्थेच्या देवगड कॉलेज युनिटच्या अध्यक्षाही आहेत. रिल्सच्या माध्यमातून अभिनयाची आवड जोपासत सलोनी कदम यांनी आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले आणि त्यातूनच त्यांना 'गमन' सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, याचे उदाहरण त्यांच्या प्रवासातून समोर आले आहे. देवगड- गढीताम्हाणे येथून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास आता रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचला असून त्यांच्या या कामगिरीचे देवगड तालुक्यातून कौतुक होत आहे.रुपेरी पडद्यावर अभिनयाच्या माध्यमातून झळकण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या युवा कलाकारांना तिच्या कामगिरीमुळे एक नवी उमेद मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg