loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत कामकाजाची प्रशासकीय आधिकारी वेळेत तपासणी करत नसल्याने कागदपत्रांची अनियमितता, सभेत देवानंद पालांडे यांनी निदर्शनास आणले

वैभववाडी (प्रतिनिधी) - ग्रामपंचायतींच्या कामकाजाची देखरेख ठेवणारे प्रशासकीय अधिकारी वेळेत तपासणी करत नसल्याने काही ग्रामपंचायतींमध्ये अनियमितता होते. यामुळे ऐनारी ग्रामपंचायतीने ५६ हजार निधी खर्च केलेला दाखवून सहा महिने संबंधित वस्तुंची खरेदी केली नसल्याचा गंभीर प्रकार पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामपंचायतींच्या खरेदी व्यवहारांची सखोल तपासणी करून हे प्रकार तातडीने थांबवावेत, अशा सूचना सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिल्या. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, साधना नकाशे यांच्यासह सर्व खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते. या सभेत ग्रामपंचायतींचा कारभार, निधीचा विनियोग आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कामकाजावर चर्चा झाली. पंचायत समिती कार्यालयासमोर ऐनारी गावातील ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर देवानंद पालांडे यांनी ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. ग्रामपंचायतींची नियमित तपासणी करणे, सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणे आणि शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च होत आहे की नाही, याची खातरजमा करणे ही पंचायत समितीच्या संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जात नसल्याने काही ठिकाणी अनियमिततेला वाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीने ५६ हजार रुपयांचा निधी खर्च केला; मात्र सहा महिने उलटूनही संबंधित वस्तूंची खरेदी झालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निधी खर्च झाल्याचे दाखविले जात असेल, तर प्रत्यक्षात वस्तू उपलब्ध आहेत की नाहीत, याची तपासणी होणे आवश्यक आहे. निधी खर्च होऊनही वस्तू उपलब्ध नसणे हा गंभीर प्रकार असून, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असे पालांडे यांनी स्पष्ट केले. तसेच अधिकार्‍यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतींची तपासणी करून खर्चाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध वस्तू यांची पडताळणी केली असती, तर अशा प्रकारांना आळा बसला असता. मात्र, तपासणीतील दिरंगाईमुळे अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामपंचायतींनी आवश्यक वस्तूंची खरेदी शक्यतो जिल्ह्यातील विक्रेत्यांकडून करावी, अशी अपेक्षा असताना काही ग्रामपंचायतींनी भुदरगड येथे जाऊन खरेदी केल्याचा मुद्दाही पालांडे यांनी उपस्थित केला. जिल्ह्याबाहेरून खरेदी करण्यामागील कारणे तपासण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला. खरेदी केलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष उपलब्धता, खरेदीची बिले, त्यावरील जीएसटीची नोंद आणि निधी खर्चाच्या कागदपत्रांची सखोल तपासणी करावी. कागदोपत्री व्यवहार आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये काही तफावत आहे का, याची खातरजमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गटविकास अधिकारी प्रमेश वाघ यांनीही निधी खर्च झाल्यानंतर संबंधित वस्तूंची खरेदी झालेली असणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्ष वस्तूंची उपलब्धता आणि खर्चाच्या नोंदी यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

सभापती सिद्धेश रावराणे यांनीही ग्रामपंचायतींच्या कामकाजाची वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. ग्रामपंचायतींमध्ये काही अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी. पंचायत समितीच्या हिरकणीच्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहतात व पदाधिकारी मात्र उपस्थित असतात यावर उपसभापतीं सांची कोलते यांनी नाराजी व्यक्त केली. हिरकणीच्या बैठकीला पदाधिकारी उपस्थित असतानाही संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा उपसभापती साची कोलते यांनी उपस्थित केला. हिरकणीच्या बैठकिला अधिकारी येणार नसतील किंवा त्यांना उशीर होणार असेल, तर त्याबाबत साधा संदेश देण्याचीही तसदी घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी बैठकीसाठी वेळेत उपस्थित राहतात; मात्र अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने पदाधिकार्‍यांना त्यांची वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत नेमके कोणी कुणाची वाट पाहायची, असा सवाल उपसभापती कोलते यांनी उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg