loader
Breaking News
Breaking News
Foto

असुर्डे जाधववाडीत ग्रामस्थांनी बांधले विजय बंधारे

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - असुर्डे ता. संगमेश्वर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी मौजे असुर्डे येथील जाधववाडीतील ग्रामस्थांनी जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या वडाचा डोह आणि करंजचा डोह येथे विजय बंधारे बांधण्यात आले आहेत. वाडी मंडळाचे अध्यक्ष विजय पलांडे, माजी सरपंच अरुण जाधव, माजी उपसरपंच राकेश जाधव, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि विद्यमान सरपंच प्रदीप शिंदे यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, आगामी काळात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी गावात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर शक्य असलेल्या उपाययोजना राबवून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. जाधववाडीतील वडाचा डोह आणि करंजचा डोह या पारंपरिक जलस्रोतांवर विजय बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते साठवून ठेवण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे भूजलपातळी वाढण्यास तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. जाधववाडीपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता गावातील इतर प्रभागांमध्येही ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे जलसंवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये विजय बंधारे बांधणे, जलस्रोतांमधील गाळ काढणे, पारंपरिक जलस्रोतांचे जतन व संवर्धन करणे अशा विविध उपाययोजनांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

गावातील पाणीपुरवठा भविष्यातही सुरळीत राहावा आणि पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सरपंच प्रदीप शिंदे यांनी दिली. पाणी ही काळाची गरज ओळखून असुर्डे जाधववाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत केलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसंवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत आहे. लोकसहभागातून पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे जतन करणे, हाच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg