loader
Breaking News
Breaking News
Foto

सह्याद्रीच्या पट्ट्यात २३ 'पंप स्टोरेज' प्रकल्प पर्यावरणासाठी घातक : डॉ. जयेंद्र परुळेकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पट्ट्यात विपुल प्रमाणात जैवविविधता, वन्यप्राणी, पक्षी आणि दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. एका बाजूला केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह झोन (जैविक संवेदनशील क्षेत्र) घोषित करण्यासाठी हरकती मागवत आहे. तर दुसरीकडे याच सह्याद्री पट्ट्यात तब्बल २३ वीजनिर्मिती 'पंप स्टोरेज' प्रकल्प लादले जात आहेत. हे प्रकल्प पर्यावरण, जलस्रोत आणि जैवविविधतेचे अतोनात नुकसान करणारे आहेत, असा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​डॉ. परुळेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, पश्चिम घाटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्याबाबत हरकती नोंदवल्या जात आहेत. असे असतानाच कोकण आणि पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे प्रकल्प आणले जात आहेत. युरोपने नाकारलेली आणि प्रचंड पाणी वापरणारी 'डेटा सेंटर' आज आपल्याकडे लादली जात आहेत. कर्जत, भीमाशंकर परिसर तसेच आजिंवडे कुडाळ येथे होणाऱ्या पंप स्टोरेज पावर प्रकल्पासाठी डोंगरावरील सुमारे २०० वर्षांपूर्वीची जैवविविधता आणि बेसुमार वृक्षतोड केली जाणार आहे. यामुळे पाणी स्त्रोत,वन्यजीव व पक्षी प्रजाती नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ​सध्या 'सुपर एल निनो'मुळे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाळा संपताच वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले असले, तरी प्रशासन केवळ फोटोबाजी करून दुष्काळाचा सामना करण्याचा दिखावा करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

​तसेच, दोडामार्ग सासोली, कुडाळ पिंगुळी आणि दोडामार्ग पाट्ये या गावांतील प्रकल्पांना स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. पिंगुळी येथील पाझर तलाव शेतकऱ्यांना वापरता येणार नसल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सासोली येथील सामायिक जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा मुद्दा माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील यांनी ऐरणीवर आणल्यानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. बांदा परिसरातील आणि सासोलीतील विकासकांच्या मनमानी कारभाराची व संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी केली. जनतेला उपयुक्त ठरणारे प्रकल्प आणावेत, पर्यावरण आणि पाण्याचा नाश करणारे प्रकल्प रद्द करावेत, असेही ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg