loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील माहिती फलक झाडी-झुडपात; वाहनचालकांची दिशाभूल!

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी ते झाराप या महत्त्वाच्या टप्प्यावर लावले गेलेले माहिती व दिशादर्शक फलक सध्या भल्यामोठ्या झाडी-झुडपांमध्ये गायब झाले आहेत. यामुळे महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ते, वळणे आणि ठिकाणांचे फलकच दिसत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात असतानाही, महामार्ग प्राधिकरणाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे पर्यटकांसह स्थानिक वाहनधारकांची मोठी दिशाभूल होत आहे. ​पत्रादेवी ते झाराप हा रस्ता गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणारा आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहने, स्थानिक प्रवासी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक ये-जा करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, पावसाळ्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर रानटी झाडी-झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक आणि धोकादायक वळणांचे संकेत देणारे बोर्ड या झुडपांमागे पूर्णपणे झाकले गेले आहेत.नवीन येणाऱ्या पर्यटकांना पुढील गाव, वळण किंवा महामार्गावरून बाहेर पडण्याचे (Exit) मार्ग वेळेत दिसत नाहीत. ​अचानक ब्रेकमुळे अपघाताची शक्यता: फलक न दिसल्याने अनेकदा चालकांना अगदी ऐन मोक्याच्या ठिकाणी गाडीचा वेग कमी करावा लागतो किंवा अचानक ब्रेक लावावा लागतो. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' म्हणून अधिकृत दर्जा मिळालेला आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पत्रादेवी तपासणी नाक्यावरून प्रवेश केल्यावर पर्यटकांना या महामार्गाचा पहिला अनुभव येतो. मात्र, माहिती फलकांची झालेली ही दुरवस्था जिल्ह्याच्या पर्यटन प्रतिमेला तडे देणारी ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

"गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताना रस्त्याचे फलकच दिसत नाहीत. नवीन चालकांना कोणत्या बाजूला वळावे हेच समजत नाही. रात्रीच्या वेळी तर हा त्रास आणखी वाढतो." असे वाहनचालक संतोष मुळीक यांनी सांगितले. ​महामार्गाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. पावसाळा संपत आला तरी अजूनही या वाढलेल्या झाडी-झुडपांची छाटणी करण्यात आलेली नाही. ​झाडी-झुडपांमुळे झाकलेले सर्व माहिती व दिशादर्शक फलक तात्काळ मोकळे करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी सावंतवाडीतील स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg