loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त, दोनदा निसटलेल्या नौकेला तिसर्‍या प्रयत्नात पकडले

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणार्‍या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना पकडून जप्त करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक कारवाई करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. जप्त करण्यात आलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधातील कठोर भूमिकेमुळे आणि विभागाच्या अधिकार्‍यांनी दाखविलेल्या चिकाटीमुळे ही कारवाई यशस्वी झाली असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित सागरी गस्त घालत असताना मुणगे समोरील समुद्रात किनार्‍यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘सुलतान’ ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळून आली. विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच संबंधित नौकेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्ती पथकाने हार न मानता नौकेचा पाठलाग सुरू केला. अखेर देवगडसमोरील समुद्रात या नौकेला रोखण्यात आणि ताब्यात घेण्यात अधिकार्‍यांना यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार संबंधित नौकेचा पाठलाग करून तिला ताब्यात घेत जप्त करण्यात आले. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिच्यावरील कायदेशीर कार्यवाही सुरू होती. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘सुलतान’ असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6335 असा आहे. श्रीमती गुलफाम अब्दुल मुनाफ या नौकेच्या मालक असून त्या पुत्तूर, जिल्हा उडुपी, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. या नौकेचा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एएन) वैध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलप्पे बंदरातील नौकांकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी मालवण आणि देवगड परिसरातील मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडे केल्या होत्या. विशेषतः या नौकांकडून स्थानिक मच्छिमारांची जाळी वारंवार तोडली जात असल्याची तक्रार होती.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि बेकायदा मासेमारी याविरोधात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अशा नौकांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली असून विभागाच्या कामकाजावरही ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारवाईला अधिक बळ मिळत असून स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष समुद्रात धडक कारवाया केल्या जात आहेत. ‘सुलतान’ नौकेवरील कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg