loader
Breaking News
Breaking News
Foto

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या हेत गावातील स्मारकाची ग्रामस्थांनी जपणूक करावी: कवी वामन पंडित

वैभववाडी (प्रतिनिधी) - कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, माझे विद्यापीठ, डोंगरी शेत माझं ग, मास्तर तुमचंच नाव लिहा” अशा विविध कविता प्रभावीपणे सादर करत कवी वामन पंडीत यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कविवर्य नारायण सुर्वे यांच्यासारखा महाकवी आपल्या हेत गावचा आहे, याचा प्रत्येक नागरिकाने सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. त्यांच्या स्मारकाचा गावाने पुरेपूर उपयोग करून घेत त्याची जपणूक करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य तथा कवी वामन पंडित यांनी केले. ​हेत येथे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘अगा.. मी जगमय झालो’ अशा निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि निलायम कृष्णकक्ष कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना वामन पंडित म्हणाले, नारायण सुर्वे शेवटपर्यंत कामगार म्हणून जगले. फुटपाथ हाच त्यांच्या कवीतेचा मंच होता. त्यांचे सात कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांनी गद्य लेखनही केले आहे. त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी ‘मास्तरांची सावली’ हा ग्रंथ लिहिला आहे. सुर्वे यांना शासनाचे अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त झाले असून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. ​नारायण सुर्वे यांच्या हेत या मूळ गावी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येत आहे, ही निश्चितच भूषणावह बाब आहे. या स्मारकामध्ये मोठे ग्रंथालय असणार आहे. देशभरातील साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी हे गाव व स्मारक पाहण्यासाठी येतील. त्यामुळे सरकारची वाट न पाहता स्मारकाची देखभाल, दुरुस्ती आणि जपणूक करण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांनी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कवी नारायण सुर्वे यांच्या स्मारकासाठी कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच वैभववाडी तालुक्यातील हेत गावात सुसज्ज स्मारक दिमाखात उभे राहील, असे भालचंद्र साठे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल म. ल. देसाई यांनी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच संबंधितांचे अभिनंदन केले. ​यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादकीय सल्लागार वर्षा देवरुखकर, कवयित्री रुंदा कांबळी, म. ल. देसाई, डॉ. शरयू असोलकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, सरपंच कांचन कांबळे, महेश संसारे, स्वप्निल खानविलकर, केंद्रप्रमुख विजय केळकर, मुख्याध्यापक संतोष मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भानुदास बुराण, किशोर कांबळे, राजेंद्र राणे, कोमसाप वैभववाडी अध्यक्ष संतोष टक्के यांच्यासह तालुक्यातील साहित्यिक, कवी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक फोंडके यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg