loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्योतिषशास्त्राच्या आचार्य परीक्षेत चैत्राली मुळ्ये-जोशी महाराष्ट्रात प्रथम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत, अपार मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर देवरूख येथे सध्या वास्तव्यास असलेल्या चैत्राली सुरेश मुळ्ये-जोशी यांनी "दि फ्युचर युनिव्हर्सिटी"च्या ज्योतिषशास्त्र आणि लाल किताब या विषयातील ‘आचार्य ’ अभ्यासक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान संपादन केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत झालेल्या सहा परीक्षांमध्ये त्यांनी ६०० पैकी तब्बल ५९५ गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची आणि अभ्यासातील सातत्याची प्रभावी छाप उमटवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. घर-संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच अभ्यासासाठी वेळ देत त्यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल, तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. ज्योतिषशास्त्र आणि लाल किताब या क्षेत्रातील सखोल अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल देवरूख तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

“आपल्या मेहनतीला कुटुंबाची साथ, गुरुजनांचे आशीर्वाद आणि श्रद्धेचे बळ मिळाले. त्यामुळे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आणि या यशाने माझ्या प्रयत्नांना एक सुंदर किनार लाभली. मात्र, ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेण्यामागचा माझा उद्देश केवळ लोकांना भविष्य सांगणे हा नाही. त्यांच्या आयुष्यातील अडचणी, समस्या आणि प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करता यावी, हा माझा प्रयत्न आहे. माझ्यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ भविष्य जाणून घेण्याचे साधन नसून, योग्य दिशा दाखवून शक्य तितक्या सकारात्मक पद्धतीने भविष्य घडविण्यासाठी मदत करण्याचे माध्यम आहे,” अशी भावना चैत्राली मुळ्ये-जोशी यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg