loader
Breaking News
Breaking News
Foto

कलंबिस्त परिसरात 'पाणी आडवा, पाणी जिरवा' उपक्रमांतर्गत वनराई बंधारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याअभावी करपून जात असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, ओहोळ आटू लागले आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त (ता. सावंतवाडी) गावाने मात्र जलसंधारणाची कास धरत संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धविकास संस्था, शिव साम्राज्य प्रतिष्ठान (गणशेळवाडी) आणि अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गट (राऊळवाडी) या तीनही संस्थांनी एकत्र येत कलंबिस्त - धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेतून कच्चा वनराई बंधारा उभारला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी सायंकाळी तिन्ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीचे दर्शन घडवत श्रमदानातून हा बंधारा उभारला. माती आणि सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरून, त्या एकावर एक रचून जवळपास साडेतीन फूट उंचीचा आणि २० फुटांपेक्षा अधिक लांबीचा मजबूत कच्चा बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे ओहोळातील पाणी अडवले जाणार असून आजूबाजूच्या १५ ते २० एकर भातशेतीला थेट फायदा होणार आहे. तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धविकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण व जलसंवर्धनासाठी काम करत आहे. संस्थेने यापूर्वीही तेरे खोल नदीपात्रात आणि विविध ओहोळांमध्ये वनराई बंधारे उभारले होते. मात्र काही वर्षे ही चळवळ थंडावली होती. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने पुन्हा कंबर कसली आहे. या कामात अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. श्रमदानापासून ते बंधारा उभारणीपर्यंत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत, शिव साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, रोहन सावंत, स्वप्निल सावंत, विराज सावंत, सुभाष देसाई, सुषमा राऊळ, रंजना राऊळ, रश्मी गवस, शालिनी राऊळ, एकता राऊळ, सुप्रिया राऊळ, स्मिता राऊळ, लक्ष्मी राऊळ, रुक्मिणी राऊळ, राजश्री राऊळ, जयश्री राऊळ, सुनिला राऊळ, वनिता गवस, सविता गवस, कविता जाधव, जागृती सावंत, दिपाश्री जाधव यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. कलंबिस्तकरांनी दाखवून दिले आहे की, सरकारी मदतीची वाट न पाहता गाव एकत्र आले तर दुष्काळावरही मात करता येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg