loader
Breaking News
Breaking News
Foto

जलसंधारण मोहिमेअंतर्गत कृषितंत्र विद्यालय लांजा येथे बंधा-याची उभारणी; कुलगुरू डाॅ.संजय भावे यांची भेट

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून कृषी तंत्र विद्यालय लांजा वतीने बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. पाण्याची दिवसेंदिवस वाढत जाणारी टंचाई, भूजल पातळीत होणारी घट आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे.याच पार्श्वभूमीवर जलसंधारण मोहीम २०२६ अंतर्गत कृषितंत्र विद्यालय, लांजा येथील प्रक्षेत्रावरील ओढ्यावर विविध ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यालयाच्या प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ओढ्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामाची माहिती घेतली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा व पुनर्भरण होण्यास अशा बंधाऱ्यांमुळे मदत होते. परिणामी परिसरातील भूजल पातळी वाढण्यास, विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा टिकवून ठेवण्यास तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढविण्यास हातभार लागणार आहे. विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील विविध कृषी प्रयोग, रोपवाटिका आणि पीक उत्पादनासाठीही या जलसाठ्याचा उपयोग होऊ शकतो.

टाईम्स स्पेशल

आज पाण्याचा प्रश्न केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिलेला नसून तो शेती, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित झाला आहे. पावसाचे अनियमित वितरण, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आणि उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई या समस्यांवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करा' हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या प्रसंगी डॉ. ए. व्ही. माने, प्रक्षेत्र संचालक, मध्यवर्ती कृषी संशोधन केंद्र, वाकवली; डॉ. प्रफुल्ल माळी, सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, दापोली; डॉ. मंदार खानविलकर, तांत्रिक अधिकारी; तसेच कृषी विज्ञान केंद्र, लांजा चे प्रमुख डॉ. ए. ए. हनुमंते उपस्थित होते. यावेळी कृषितंत्र विद्यालय, लांजाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुदेश कुमार चव्हाण तसेच विद्यालयातील अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg