loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडसमोर कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त

देवगड (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. आचरा परिसरातील समुद्रात बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील मलपे बंदरातील ‘हनुमा ध्याना’ या हायस्पीड ट्रॉलर नौकेचा पाठलाग करून देवगडसमोरील समुद्रात जप्त करण्यात आली. तांडेलसह सात खलाशी असलेली ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. गेल्या १५ दिवसांतील परप्रांतीय नौकेविरुद्धची विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. बुधवारी (ता. १८) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला आचरा समोरील समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे ९ ते १० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका विनापरवाना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच संबंधित ट्रॉलरने वेगाने पळ काढला. मात्र, विभागाच्या पथकाने पाठलाग सुरू ठेवत देवगड समोरील समुद्रात या नौकेला पकडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार नौका ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘हनुमा ध्याना’ असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6013 असा आहे. सुनील शेखर कोट्यान (जि. उडुपी, कर्नाटक) हे या नौकेचे मालक आहेत. मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे हायस्पीड ट्रॉलरमुळे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. परराज्यातील अधिक क्षमतेच्या नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करीत असल्याने स्थानिक मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने अशा नौकांविरुद्ध कठोर भूमिका घेत कारवाई तीव्र केली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधात सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अशा कारवायांना गती मिळत असल्याचे चित्र आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अंमलबजावणी अधिकारी प्रतिक महाडवाला यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. रात्रीच्या अंधारात अधिक वेगवान ट्रॉलरचा समुद्रात पाठलाग करून त्याला पकडण्याचे आव्हान पथकाने यशस्वीपणे पेलले. बेकायदा मासेमारीविरोधात विभागाने स्वीकारलेली कठोर भूमिका यापुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg