loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन दुष्काळसदृष्य परिस्थितीत पानवल धरणात मुबलक पाणीसाठा, पण उपसा नसल्याने कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणूकीचा उपयोग काय?

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला भेडसावणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे. धरण बांधले, पाणी साठले; पण पाईपलाईनच जोडली नाही! अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐन दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर न होता पालिकेची वीजबिलापोटी होणारी उधळपट्टी रत्नागिरीकरांच्या संतापाचे कारण ठरत आहे. सध्या रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पाण्याचा मोठा उपसा करावा लागत असल्याने पालिकेला दरमहा लाखो रुपयाचे वीजबिल भरावे लागते. दुसरीकडे, शहरासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पानवल धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) तंत्रज्ञानाद्वारे थेट शहरात आणता येणे शक्य आहे, ज्यामुळे विजेचा भलामोठा खर्च पूर्णपणे वाचू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, या धरणातील पाणी शहरापर्यंत आणणारी नाचणे परिसरातील अवघी १३०० मीटरची पाईपलाईन जोडण्याचे काम अद्याप रखडलेले आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे या १३०० मीटरच्या कामासाठी लागणारे सुमारे २५० पाईप प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध आहेत. सर्व सामग्री हजर असूनही काम मात्र ठप्प पडले आहे. जुन्या कामाचे थकीत पैसे मिळाले नसल्यामुळे ठेकेदाराने पुढील काम करण्यास थेट नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. धरण तयार आहे, पाणी साठलेले आहे आणि पाईपही उपलब्ध आहेत; पण फक्त थकीत बिलांच्या वादामुळे जोडणी न झाल्याने मुबलक पाणी असूनही नागरिक तहानलेलेच राहणार आहेत. येत्या डिसेंबरपूर्वी ही पाईपलाईन पूर्ण करून पानवल धरणाचे पाणी रत्नागिरी शहरात आणणे अत्यंत गरजेचे आहे.

टाईम्स स्पेशल

अन्यथा, हक्काचे गुरुत्वाकर्षणाने मिळणारे पाणी धरणातच पडून राहील आणि शहराला शीळ धरणाच्या महागड्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागेल. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार अखेर करदात्या नागरिकांच्याच खिशातून वसूल होणार आहे. पाणीटंचाईचे ढग घोंगावत असताना उपलब्ध पाण्याचा वापर न होणे ही स्थानिक प्रशासनाची मोठी निष्काळजीपणाची बाब मानली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या थकीत रकमेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि ही पाईपलाईन युद्धपातळीवर पूर्ण करून रत्नागिरीकरांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg