loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेने सुरक्षित प्रवास या मानवी हक्कांचे उल्लंघन, सौंदळ स्थानकाला तात्काळ प्लॅटफॉर्म द्या.- पाचल ग्रामविकास मंडळाची मागणी

राजापूर, जि. रत्नागिरी :कोकण रेल्वेवरील विलवडे आणि राजापूर रोड या दोन स्थानकांच्या मध्ये सौंदळ स्थानक आहे. लोकांच्या मागणीमुळे कोकण रेल्वेने १५ वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर हे स्थानक केले. मात्र प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.१) सोयीचे स्थान :सौंदळ स्थानक ओणी - अणुस्कुरा - कराड राज्य महामार्गावर आहे. रस्ता आणि स्थानक यामध्ये फक्त २५० मीटर अंतर आहे. या रस्त्यावरून एस.टी. बसची वाहतूक राजापूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी अशी सुरू आहे.२) सुरक्षित प्रवास हा मूलभूत हक्क :प्लॅटफॉर्म नसल्यामुळे वयोवृद्ध प्रवासी, लहान मुले, महिला यांना ट्रेनमधून उतरणे - चढणे अत्यंत कठीण होत आहे. सुरक्षित प्रवास हा त्यांचा मूलभूत आणि मानवी अधिकार आहे, त्याचे कोकण रेल्वे उल्लंघन करीत आहे. महाराष्ट्रात प्लॅटफॉर्म नसलेले सौंदळ हे एकमेव स्थानक आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.३) सुमारे ५० गावांना सोयीचे : सौंदळ, येळवण, परटवली, आडवली, तुळसवडे, धामणपे, रायपाटण, पाचल, हरळ, परुळे, कारवली, येरडव, करक, पांगरी, काजीर्डा, कोळंब, मुर, तळवडे, मिळंद, ताम्हाणे, झर्ये, रिंगणे, कोंडगे, कुरंग, ओशिवळे, बागवेवाडी, कोळवणखडी, गोठणे, शिळ, कोंड्ये, दोनीवडे, आंगले, फुपेरे, ओणी, मंदरूळ, वडवली, चुना-कोळवण, ओझर, चिखलगाव या राजापूर तालुक्यातील, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ता. शाहूवाडीतील अणुस्कुरा, मांजरे, जुगाई-येळवण, तर वैभववाडी तालुक्यातील नेर्ले, तिरवडे, जांभवडे, उपळे अशा सुमारे ५० गावांना हे स्थानक अतिशय सोयीचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

४) पर्यटनाला चालना मिळेल :सौंदळ स्थानक झाल्यास राजापूर तालुक्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल. चुना-कोळवण आणि ओझर येथील धबधबे, अर्जुना नदी धरण, अणुस्कुरा घाट येथील निसर्गसौंदर्य, तर रायपाटण येथील छ. शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी केलेले संगोबाचे मंदिर, पाचलचे केदारलिंग मंदिराची देवराई आणि सुंदर मंदिर इमारत पाहायला लोक येत असतात. गणपती उत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण वाढेल. गणपती उत्सव विशेष गाड्या सौंदळ स्टेशनला थांबणे शक्य होईल. पाचल आणि सौंदळ येथील उरुसही प्रसिद्ध आहेत. देश-परदेशातून श्रद्धाळू येत असतात.५) शेतमालाला चांगला भाव मिळेल :या सर्व भागात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांचे उत्पादन वाढले आहे. रेल्वे स्थानक झाल्यास खरेदीसाठी व्यापारी जास्त येऊन चांगला दर मिळू लागेल. काजू, आंबरस, आंबापोळी इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनांना मागणी वाढण्यास मदत होईल.आमच्या मागण्या :अ) सौंदळ येथे पूर्वेच्या बाजूला प्लॅटफॉर्म व्हावा.ब) सर्व उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या सौंदळ येथे थांबवाव्यात.क) सौंदळ येथे टर्मिनल झाल्यास सर्व गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय करता येईल. कारण बाजूला बारमाही वाहणारी अर्जुना नदी आहे.सौंदळ रेल्वे स्थानकासंदर्भात सुचविलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आम्ही नम्र विनंती करीत आहोत.असे मधुकर गुरव, विजय देवरुखकर, श्रीकृष्ण सुतार पाचल ग्रामविकास मंडळ, मु. पो. पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांनी म्हटले आहे .तसेच सौदल येथे प्रवासी वर्गास गाडीतून उतरणे जीवघेणे ठरत असल्याने कोकण रेल्वेने सुरक्षित प्रवास या मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे व सौंदळ स्थानकाला तात्काळ प्लॅटफॉर्म द्यावे ,अशी मागणी त्यांनी केली आहे ..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg