loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली विंटर सायक्लोथॉनच्या दहाव्या पर्वाने १५ नोव्हेंबरला अवघी दापोली होणार सायकलमय

संगलट (इक्बाल जमादार) - शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सायकल संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड वाढीस लागावी या व्यापक हेतूने दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता सोहनी विद्यामंदिर मैदानात बहुचर्चित ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६’च्या दहाव्या सिझनचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मानाच्या सायक्लोथॉनचे यंदाचे हे दशकपूर्ती वर्ष असून राज्य, देश तसेच विदेशातील अनेक नावाजलेले सायकलपटू आपल्या कुटुंबीयांसमवेत दापोलीत दाखल होणार असल्याने अवघी दापोली नगरी सायकलमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. स्पर्धकांसाठी ३० किलोमीटर आणि ५० किलोमीटर अशा दोन टप्प्यांत ही स्पर्धा होणार असून, अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारास आकर्षक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील ५० किमी अंतराचा कोस्टल सिनिक रुट सोहनी विद्यामंदिर दापोली येथून सुरू होऊन करजगाव, परशुराम भूमी बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै आणि आसूद असा निसर्गरम्य सागरी किनारपट्टीवरून मार्गक्रमण करत पुन्हा दापोली येथे समाप्त होईल; तर ३० किमी मार्गावर धावणारी सायकल सोहनी विद्यामंदिर दापोली ते लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, आसूद आणि दापोली अशा मार्गाने पूर्ण होईल. या संपूर्ण राईड मार्गावर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी स्वयंसेवक, पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपहार, बॅकअप टेम्पो आणि तत्काळ वैद्यकीय मदतीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या नऊ पर्वांप्रमाणेच याही वर्षी देश-विदेशात सायकलिंग केलेल्या अनुभवी रायडर्सशी संवाद साधणे आणि त्यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेच्या निमित्ताने दाखल होणारे पर्यटक व स्पर्धक दापोलीतील पर्यटन स्थळांना भेटी देत स्थानिक उत्पादनांची खरेदी व अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीसह मासळीच्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याने स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर ५ नोव्हेंबरपर्यंत आगाऊ ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणीकृत स्पर्धकांना १४ नोव्हेंबरच्या सायंकाळी चेस्ट बिब नंबरचे वाटप केले जाईल. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ अथवा ९०२८७४१५९५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नागरिकांनी आत्तापासूनच सरावाला सुरुवात करून आपल्या संपूर्ण कुटुंबासह या महोत्सवात सहभागी व्हावे आणि सायकल चालवून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे जाहीर आवाहन दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg