loader
Breaking News
Breaking News
Foto

उभादांडा येथे अंबरग्रीस व देवमाशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती, जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा उपक्रम

वेंगुर्ला : जागतिक मत्स्यव्यवसाय दिन (२१ नोव्हेंबर) निमित्त डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे मच्छीमारांसाठी अंबरग्रीस (Ambergris) आणि देवमाशांच्या संरंक्षण बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक मत्स्यव्यवसाय दिन २०२६ ची संकल्पना ‘Empowering People for Change: Advancing Decent Work in Fisheries and Aquaculture, particularly for Youth and Women’ (बदलासाठी लोकांचे सक्षमीकरण : मत्स्यव्यवसाय व मत्स्यपालन क्षेत्रात विशेषतः महिला आणि युवकांसाठी सन्मानजनक रोजगाराच्या संधींना चालना देणे) अशी आहे. या पार्श्वभूमीवर सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि मच्छीमारांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात अंबरग्रीस म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचे महत्त्व आणि त्यासंबंधीचे कायदेशीर नियम याबाबत मच्छीमारांना माहिती देण्यात आली. अंबरग्रीस हा देवमाशाच्या पचनसंस्थेत तयार होणारा मेणासारखा पदार्थ असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याने त्याच्या बेकायदेशीर व्यापाराचे प्रकार घडतात. भारतात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत देवमाशांना संरक्षण देण्यात आले असून अंबरग्रीसची बेकायदेशीर खरेदी-विक्री, वाहतूक व साठवण याबाबत कायदेशीर निर्बंध आहेत. समुद्रकिनारी अंबरग्रीससदृश पदार्थ आढळल्यास त्याची विक्री किंवा व्यवहार न करता संबंधित वनविभाग अथवा अधिकृत यंत्रणेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी देवमाशांचे सागरी परिसंस्थेतील महत्त्व, त्यांचे संवर्धन, समुद्रातील जैवविविधतेचे संतुलन राखण्यामधील त्यांची भूमिका तसेच देवमाशांच्या संरक्षणासाठी मच्छीमारांचे सहकार्य किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष मच्छीमारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या शंका आणि अनुभव जाणून घेण्यात आले. प्रत्यक्ष भेटीच्या या जन जागृती कार्यक्रमास प्रा. डॉ. आसिफ पागरकर, प्रा. डॉ. मनोजकुमार घुगुसकर, तसेच सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले आणि प्रा. सचिन साटम सहभागी होते. समुद्र आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी मच्छीमारांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून अशा जनजागृती उपक्रमांमुळे संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg