loader
Breaking News
Breaking News
Foto

संगम ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर येथील संगम ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी विधाता कलेक्शन येथील सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाली. या सभेला जिल्हा परिषद सदस्या माधवीताई गिते, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विवेक शेरे तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थितांना विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात संघाच्या सभासदांच्या दिवंगत नातेवाईकांना व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विवेकभाई शेरे यांनी आपल्या कामाच्या अनुभवातून योग्य आणि गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ निश्चितच निराधार व गरजू नागरिकांना होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्या माधवीताई गिते यांनीही कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा सहकार्य आवश्यक असल्यास आपण शक्य ते सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी यांनी नवीन पिढीला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, त्यांची तयारी कशी करावी आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर कसा टाळावा, याविषयी शाळा व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे. कोणालाही आधार कार्ड क्रमांक, ओटीपी अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन केले.संघाचे अध्यक्ष प्रमोददादा शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषणातून संघाच्या कार्याचा आढावा घेत ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

उपाध्यक्ष उदयआप्पा संसारे यांनी संघाच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती देतानाच आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरासह विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. या सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीनिमित्त संघाच्या प्रत्येक सभासदाला संघातर्फे कापडी पिशवी, सुगंधी उटणे आणि साबण भेट देण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर वाढावा आणि प्रदूषणाला आळा बसावा, हा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संघांचे सचिव बेंडके गुरुजी यांच्या पुढाकाराने व सर्व सभासदांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला. मान्यवरांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यामुळे सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg