loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रज्वल घडशी मृत्यू प्रकरणी ग्रामस्थ घेणार आमदार किरण सामंत यांची भेट

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सोनवी नदीपात्रातील खड्ड्यात गणेश विसर्जनावेळी बुडून प्रज्वल पुरूषोत्तम घडशी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही या घटनेप्रकरणी अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ लवकरच आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडणार असल्याचे सांगण्यात आले. सोनवी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या प्रज्वल घडशी या उच्चशिक्षित तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटून गेले असतानाही संबंधित ठेकेदार कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित प्रशासनाच्या भूमिकेबाबत ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महसूल विभागाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेला शब्द अद्याप पूर्ण झालेला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनवी आणि परचुरी नदीपात्रात महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर गाळ व वाळूचा उपसा करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोकलेन आणि हायवा यांसारखी अवजड यंत्रसामग्री नदीपात्रात उतरवून काम करण्यात आले. नदीपात्रातील उत्खनन करताना आवश्यक ती समपातळी राखणे, सुरक्षितता उपाययोजना करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना संबंधित यंत्रणांचे अधिकारी नेमके काय करत होते, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरवर्षी गणेश विसर्जनासाठी शेकडो नागरिक या ठिकाणी येतात. त्यामुळे नदीपात्रात मोठे आणि खोल खड्डे निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी धोक्याचे फलक, बॅरिकेड्स किंवा अन्य सुरक्षाव्यवस्था करणे आवश्यक होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या धोकादायक परिस्थितीची कल्पना प्रशासनाला देण्यात आली होती, तरीही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रज्वल घडशीच्या मृत्यूमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा केवळ एक अपघात म्हणून या घटनेकडे न पाहता नदीपात्रातील उत्खनन, निर्माण झालेले खोल खड्डे आणि सुरक्षेच्या उपाय योजनांचा अभाव यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. संबंधित ठेकेदार कंपनीची जबाबदारी निश्चित करावी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकार्‍यांची भूमिका तपासावी आणि महसूल विभागाच्या कारवाईबाबत स्पष्टता द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टाईम्स स्पेशल

महसूल विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार चौकशीचे काय झाले, दोषी कोण आढळले आणि पुढील कारवाई कधी होणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. प्रज्वल घडशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या परिस्थितीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. प्रज्वलच्या मृत्यूची सखोल चौकशी, नदीपात्रातील उत्खननाची तपासणी, संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करणे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आमदार सामंत यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg