loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यातील डायलिसिस केंद्रे बंद असताना लांजा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस केंद्र बुधवार पासून पुन्हा पूर्ववत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : आर्थिक अडचणी आणि निधीअभावी राज्यातील डायलिसिस केंद्रे बंद असताना लांजा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस केंद्र बुधवार पासून पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. आमदार किरण सामंत यांनी डायलिसिस सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नसल्याची आक्रमक भूमिका घेत पुढाकार घेतल्याने लांजा परिसरातील डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लांजा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी १७ फेब्रुवारी रोजी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रात डायलिसिससाठी पाच बेडची सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सुरू झाल्यापासून लांजा तालुक्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळण्याची सोय झाली होती. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना रत्नागिरी येथे जावे लागत होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे हे केंद्र बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णांसमोर पुन्हा उपचारांसाठी लांबचा प्रवास करण्याचे संकट उभे राहिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार किरण सामंत यांनी डायलिसिस सेवा बंद होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सेंटर बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास स्वतः पुढाकार घेऊन ते सुरू ठेवू, प्रसंगी टेक्निशियनचा पगारही स्वतःच्या खिशातून देऊ, अशी आक्रमक भूमिका घेत ठाम ग्वाही त्यांनी दिली होती. तसेच रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या संबंधित एजन्सीलाही त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता. दरम्यान, राज्यातील डायलिसिस केंद्रांचे संचालन एचएलएल या संस्थेमार्फत केले जाते. या केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून (एनएचएम) निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निधी रखडल्याने राज्यातील अनेक डायलिसिस केंद्रांच्या सेवेवर परिणाम झाला आहे. थकीत निधी मिळावा यासाठी एचएलएल संस्थेने एनएचएमला लेखी पत्र देऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. मात्र, निधीचे भुगतान न झाल्याने ११ नोव्हेंबर पासून राज्यातील केंद्रे बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली.

टाईम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांच्या पुढाकार आणि आक्रमक भूमिकेमुळे लांजा येथील डायलिसिस केंद्र पुन्हा पूर्ववत झाले असून आमदार किरण सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डायलिसिस केंद्रचे टेक्निशियन मनोज कांबळे, हृतिक शिवगण, मनस्वी गुरव, निलेश सुवारे आदी कर्मचारींनी बुधवारी काम सुरू केले. दरम्यान, या कर्मचार्‍यांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्यासह नंदराज कुरूप, बाबा भिंगार्डे आणि सचिन भिंगार्डे यांनी भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिले, तसेच डायलिसिस केंद्राची पाहणी केली. डायलिसिस हा किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार आहे. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते. अशा परिस्थितीत सेंटर बंद झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, इतर ठिकाणी डायलिसिस केंद्र बंद असताना लांजात डायलिसिस केंद्र सुरू असून डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारांसाठी रुग्णांना रत्नागिरीला जाण्याची वेळ टळल्याने लांजा तालुक्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg