loader
Breaking News
Breaking News
Foto

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये 'रानमाणूस’ प्रसाद गावडेंसोबत विद्यार्थ्यांचा निसर्गसंवर्धन, संस्कृती व शाश्वत विकासावर संवाद

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक जागृती या विषयावर कोंकणी रानमाणूस श्री प्रसाद गावडे यांच्या सोबत विशेष संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रसाद गावडे, संस्थेचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या संवादात्मक सत्रात विभव राऊळ व करीश्मा मांजरेकर या विद्यार्थ्यांनी कोकणातील निसर्ग, समृद्ध संस्कृती, जैवविविधता आणि स्थानिक साधनसंपत्ती याबरोबरच पर्यावरण संवर्धन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर आणि शाश्वत विकास या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत प्रसाद गावडे ‘रानमाणूस’ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डिजिटल माध्यमांचा केवळ मनोरंजनासाठी वापर न करता आपल्या गावाची, संस्कृतीची आणि निसर्गाची ओळख जगापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा सकारात्मक व सर्जनशील वापर कसा करता येईल, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. ‘राखणदार’ पदयात्रेतील अनुभव सांगताना प्रसाद गावडे यांनी कोकणातील निसर्ग, स्थानिक लोकजीवन, पर्यावरणासमोरील आव्हाने आणि त्यांनी अनुभवलेल्या वास्तवाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. आपल्या आजूबाजूच्या परिसराकडे केवळ रोज दिसणाऱ्या गोष्टी म्हणून न पाहता त्यामागील निसर्गमूल्य, सांस्कृतिक महत्त्व आणि भविष्यातील क्षमता ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरण यांचा समतोल, पारंपरिक व आधुनिक जीवनपद्धती, जमीन व विकास प्रकल्प, स्थलांतर, कृषीपर्यटन आणि इकोसेन्सिटिव्ह क्षेत्र यांसारख्या विषयांवरही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सत्र केवळ पर्यावरण जागृतीपुरते मर्यादित न राहता विकास, रोजगार, स्थानिक अस्मिता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा परस्परसंबंध समजून घेणारा विचारमंथनात्मक संवाद ठरला.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या या संवादातून निसर्गाकडे संवेदनशीलतेने पाहणे, प्रश्न विचारणे, स्थानिक साधनसंपत्तीचे महत्त्व ओळखणे आणि आपल्या कोकणाच्या शाश्वत भविष्यासाठी योगदान देणे, याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सह शिक्षिका इंतिझिया फर्नांडिस यांनी ओघवत्या शैलीत केले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सदस्य डॉ.सतीश सावंत तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg