loader
Breaking News
Breaking News
Foto

बेसुमार वृक्षतोडीमुळे जलपातळी खालावली, पर्यावरणाचा समतोल धोक्यात!

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - यंदा पाऊस कमी पडला जवळजवळ पावसाळा संपून महिनाही उलटला नाही, पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी ’बोंबाबोंब’ सुरू झाली असून, भूगर्भातील आणि नदी, विहीरी, धरणांमधील जलपातळी पूर्णपणे खालावली आहे. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये दिसणारे पाण्याचे संकट यंदा ऑक्टोबरमध्येच दारात उभे ठाकल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीला निसर्गाचा लहरीपणा जेवढा कारणीभूत आहे, त्याहून अधिक मानवाने केलेली बेसुमार वृक्षतोड जबाबदार असून वृक्ष तोडीवर बंधी आणून वेळीच वृक्ष संवर्धन केले नाही तर पुढील दिवसांचे भयानक चित्र असेल यात शंका नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. नेहमीपेक्षा यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले, आणि जेमतेम दोन ते अडीच महीने पाऊस पडला बाकीचे दिवस कोरडे गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या सुरुवातीला दिलासा देतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण असमान राहिले आणि त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नद्यांमधील पाणी आत्ताच आटले आहे. ग्रामीण भागासह निमशहरी भागातही पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. याला बेसुमार होत असलेली वृक्षतोड हेच पाण्याच्या टंचाईचे मुळ कारण असुन पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला असून याला मुख्यत्वे ’मानवनिर्मित कारणे’ कारणीभूत आहेत. वृक्षतोडीच्या नावाखाली जंगले बोडकी झाली आहेत. विकासकामे, रस्ते रुंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली हजारो वृक्षांची कत्तल केली गेली आहे. आजही रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात वृक्षतोड होत आहे. निसर्ग कोपला तरीही संबंधित वनअधिकारी यांना वृक्षतोडीवर निर्बंध आणून संवर्धन करूया याबाबत कोणतीही कार्यवाही नसल्याची नाराजी पर्यावरण प्रेमीतून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

जमिनीत पाणी जिरवणे थांबले आहे कारण झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करतात. झाडेच नष्ट झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून गेले आणि भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होऊ शकले नाही. त्यामुळे जंगले आणि झाडे कमी झाल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमान कमालीचे वाढले आहे, ज्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. वृक्षतोडीमुळे पावसाचे चक्र बदलले असून ऐनवेळी पडणारा पाऊस जमिनीची धूप करून निघून जात आहे. सावलीसाठी झाड राहिले नाही सर्वत्र रखरखाट आहे. जर आपण आताच बेसुमार वृक्षतोड थांबवली नाही आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले नाही, तर येत्या काही वर्षांत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच पाण्याचा दुष्काळ पडेल असे पर्यावरण तज्ञाचे स्पष्ट मत आहे. तसेच वृक्षतोडी संदर्भात कडक कायदे करून वृक्षतोड करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे, तसेच केवळ वृक्षारोपण न करता, लावलेली झाडे जगवण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवावी लागणार असून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करणे आदी उपाययोजना करणे बंधनकारक असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg