loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख तहसिल कार्यालयात ग्रामस्थांचे हेलपाटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन मांगलेंनी कर्मचार्‍याला शिकविली अद्दल

देवरुख : देवरूख तहसील कार्यालयात गुरुवारी एका मुजोर कर्मचार्‍याची अरेरावी आणि सामान्य नागरिकांची झालेली हेळसांड समोर आली. रेशन कार्डावरील नाव कमी करण्यासाठी मैलोनमैल प्रवास करून आलेल्या गरीब ग्रामस्थांना ‘माझी बॅग भरलेली आहे, कुठेही तक्रार करा!’ असे उर्मट उत्तर देणार्‍या या शासकीय कर्मचार्‍याला शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख सचिन मांगले यांनी आपल्या आक्रमक पवित्र्यातून चांगलाच धडा शिकवला. या प्रकरणात तहसीलदार अमृता साबळे यांनीही तात्काळ हस्तक्षेप केल्याने संबंधित कर्मचार्‍याची कानउघडणी झाली आणि रडकुंडीला आलेल्या ग्रामस्थांची कामे अवघ्या मिनिटांत मार्गी लागली. ग्रामीण भागातील काही हतबल नागरिक एसटीचे भाडे खर्च करून आणि आपली रोजंदारी बुडवून देवरुख येथील संगमेश्वर तहसील कार्यालयात आले होते. संबंधित टेबलवर बसलेल्या कर्मचार्‍याने कोणतीही सहानुभूती किंवा संवेदनशीलतेचा दाखला न देता, आज काम होणार नाही, सोमवारी या! असे सांगत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आम्ही खूप लांबून आलोय, आजच काम करून द्या, अशी गयावया ग्रामस्थांनी केली. मात्र, पदाची आणि अधिकाराची नशा डोक्यात गेलेल्या त्या कर्मचार्‍याने अत्यंत बेजबाबदारपणे नागरिकांना अपमानित करत, तुम्हाला जिथे तक्रार करायची ती करा, माझी बॅग भरलेली आहे! अशी उर्मट भाषा वापरली. सामान्य जनतेशी सुरू असलेला हा प्रकार तिथे उपस्थित असलेले शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन मांगले यांच्या निदर्शनास आला. नागरिकांचा हा अपमान पाहून मांगले यांचा पारा चढला आणि त्यांनी तात्काळ आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार अमृता साबळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्या कामचुकार कर्मचार्‍याचा संपूर्ण पाढाच तहसीलदारांसमोर वाचत संताप व्यक्त केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार अमृता साबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित कर्मचार्‍याला तात्काळ कार्यालयात बोलावून त्याची चांगलीच कानउघडणी केली आणि ताबडतोब काम करण्याचे सक्त आदेश दिले.

टाईम्स स्पेशल

तहसीलदारांच्या या दरडावणीनंतर त्या शासकीय कर्मचार्‍याची हवा जिरली आणि ग्रामस्थांची रखडलेली सर्व कामे काही वेळातच पूर्ण झाली. एका बाजूला हातावर पोट असणारी गरीब जनता शासकीय कार्यालयांत अशा तुसड्या वागणुकीचा सामना करत असताना, या ’बॅग भरलेल्या’ आणि मुजोर कर्मचार्‍यांचा माज नेमका कोण उतरवणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. संकटसमयी वेळेवर धावून येऊन न्याय मिळवून देणारे शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन मांगले आणि तात्काळ पावले उचलणार्‍या तहसीलदार अमृता साबळे यांचे सर्व स्तरांतून आभार मानले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg