loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'सुरमयी दिवाळी पहाट' उत्साहात संपन्न; सुमधुर संगीताने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध!

सावंतवाडी (प्रतिनिधी): पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचे स्वर, नाट्यसंगीताची भावस्पर्शी लय आणि लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल बरसात... अशा संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीताच्या स्वरांतून सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाने सावंतवाडीच्या कलासंपन्न भूमीचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित केला. ​यावेळी बोलताना राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी, "सावंतवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असून, येथील नाटक आणि संगीताची समृद्ध परंपरा कायम टिकवून ठेवणे हेच आपले उद्दिष्ट आहे," असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, माझे वडील कै वसंतशेठ केसरकर यांनी या कलेचा कायमच आदर करून तीला प्रोत्साहन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सावंतवाडीतील सांस्कृतिक चळवळी आणि नाट्यपरंपरेच्या जतनामध्ये आपल्या कुटुंबाचेही मोठे योगदान राहिल्याची आठवण त्यांनी यावेळी जागवली. सावंतवाडीची संगीत परंपरा आजही सद्गुरू संगीत विद्यालयाच्या माध्यमातून जिवंत असल्याचे सांगत त्यांनी गुरुवर्य निलेश मेस्त्री, किशोर सावंत आणि बाळ पुराणिक यांच्या योगदानाचा विशेष गौरव केला. तसेच आपण नगराध्यक्ष असताना रोवलेली 'पाडवा पहाट'ची परंपरा गेल्या २१ वर्षांपासून अखंड सुरू असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गुरुवर्य निलेश मेस्त्री यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ​यानंतर सुरू झालेल्या संगीत मैफलीत संगीत संयोजनाची जबाबदारी किशोर सावंत यांनी सांभाळली, तर निलेश मेस्त्री यांनी हार्मोनियमवर सुरेल साथ दिली. युवा तबलावादक निरज भोसले, अश्विन जाधव आणि मंगेश मेस्त्री यांनी आपल्या तालवादनातून मैफलीत रंग भरले. संगीत शिक्षक व गायक नितीन धामापूरकर, गायिका वर्षा देवण, केतकी सावंत, समृद्धी सावंत आणि ॲड. सिद्धी परब यांनी नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी गीतांची मेजवानी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

टाईम्स स्पेशल

या संगीत सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, निवृत्त शिक्षक म. ल. देसाई, भरत गावडे, दीपक पटेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, ॲड. नकुल पार्सेकर, नायब तहसीलदार (निवडणूक) सविता कासकर, ‘सुरमयी दिवाळी पहाट’चे समन्वयक आर्यन देसाई, प्रा. प्रतिभा चव्हाण, मालवणी कवी दादा मडकईकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार सविता कासकर - तारी यांनी केले, तर प्रा. रूपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार आर्यन देसाई यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg