loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळविले तर ठाण्यात पाय ठेऊ देणार नाही, अतिरिक्त 60 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा प्रकरणी मनोज प्रधान यांचा हल्लाबोल,

ठाणे दि.१९(प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सूर्या प्रकल्पातून ठाण्याला अतिरिक्त 60 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता करण्याची वेळ येताच भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोधाचा सूर आळवला आहे. आमच्या माहितीप्रमाणे नरेंद्र मेहता यांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी किमान तथ्य आणि आकडेवारीचा अभ्यास करावा आणि त्यानंतर विरोध करावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लगावला आहे. तसेच, ठाण्यातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी बघ्याची भूमिका न घेता मध्यस्थी करावी, असे आवाहनही मनोज प्रधान यांनी केले आहे. सूर्या धरण प्रकल्पातील पाणी ठाणे महापालिकेला देण्याच्या प्रस्तावावरून मिरा-भाईंदरमध्ये तीव्र राजकीय वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांनी मिरा-भाईंदरच्या हक्काचे किंवा या प्रकल्पातील कोणतेही पाणी ठाण्याला देण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रधान म्हणाले की, सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या धामणी धरणातून तसेच कवडास बंधाऱ्यातून ४०३ एमएलडी पाण्यापैकी मीरा-भाईंदर महानगरपालिका२१८ एमएलडी, वसई-विरार महानगरपालिका १७० एमएलडी, सूर्या प्रकल्पाजवळील ग्रामीण भाग (२७ ते ४४ गावे) १५ एमएलडी पाण्याचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी वसई-विरार शहराला या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाणीपुरवठा सुरू झाला असून, मीरा-भाईंदरसाठीच्या २१८ एमएलडी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीचे व जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी त्यांना मिळणार असतानाही अद्याप पाणी मिळाले नाही, असे म्हणताना ते ज्या पालिकेत सत्तेवर बसले आहेत. त्या पालिकेच्या प्रशासनाकडून त्यांना वेळेत कामे करून घेता येत नसतील तर ते त्यांचे अपयश आहे. जर, वसई-विरारमध्ये पाणीपुरवठा होत असेल आणि मीरा-भाईंदरमध्ये होत नसेल तर त्याचे आत्मचिंतन मेहतांनी करावे. आजमितीला मीरा-भाईंदर शहराची सध्याची अंदाजित लोकसंख्या सुमारे १५ लाख असून, शहराला दररोज प्रत्यक्षात दररोज १९५ ते २०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहराची दैनंदिन गरज २४० ते २८० एमएलडी इतकी आहे. आता सूर्या प्रकल्पातून 218 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा झाला तर मीरा-भाईंदरला सुमारे 138 दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. तर, ठाणे शहराची सध्याची अंदाजित लोकसंख्या सुमारे २९.८ लाख असून, शहराला चार मुख्य जलस्रोतांमधून दररोज एकूण ५९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहराची दैनंदिन गरज ६२७ ते ६४० एमएलडी आहे. म्हणजेच आजरोजी ठाण्याला 50 दशलक्ष लिटर पाण्याची टंचाई भासत आहे. उलटपक्षी सुर्या प्रकल्पातील पाणीपुरवठ्यामुळे मीरा-भाईंदरला गरजेपेक्षा अधिकचे 138 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यातील 60 दशलक्ष लिटर पाणी ठाण्याला दिले तरी मीरा-भाईंदरकडे अतिरिक्त 78 दशलक्ष लिटर पाणी उरणार आहे. याचा साधा गणितीय अभ्यास नरेंद्र मेहता यांना करता येत नसेल तर ते दुर्देव आहे, अशी टीकाही मनोज प्रधान यांनी केली.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मिरा-भाईंदरच्या हक्काचे पाणी कमी केले जात नसून केवळ शिल्लक पाण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधील नागरिकांची दिशाभूल तर केली जात आहेच; शिवाय, ठाणेकरांनाही तहानलेले ठेवण्याचा घाट घातला जात आहे. ही बाब ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माधवी नाईक यांनी मेहतांच्या यांच्या ध्यानात आणून द्यावी. तसेच, मेहता यांनी अभ्यास करून आपली भूमिका बदलावी अन्यथा, ठाणेकर त्यांना ठाण्यात पाय ठेवू देणार नाहीत, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg