loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण शहराच्या मध्यवर्ती असलेली जि.प. शाळा गिळंकृत करण्याचा बिल्डरचा प्रयत्न शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी उधळला, शाळा पुन्हा दिमाखात सुरु

रत्नागिरी : चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातील मोक्याची जिल्हा परिषद शाळेची जागा गिळंकृत करण्यासाठी बिल्डरने रचलेला सापळा उधळून लावत, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी चिपळूण खेंड येथील बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा पुन्हा दिमाखात सुरू केली आहे. २०२४ पासून ’शून्य पटा’वर गेलेली आणि मूळ मालकाच्या माध्यमातून बिल्डरच्या घशात जाण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही शाळा आज २३ चिमुकल्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजली आहे. चिपळूण खेंड येथील या शाळेला मोठा गौरवशाली इतिहास आहे. एकेकाळी सव्वातीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी, प्रशस्त पटांगण आणि मुबलक क्रीडा साहित्याने ही शाळा बहरलेली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, २०२४ पासून शाळेची पटसंख्या शून्यावर आली. ही शाळा भविष्यात कधीच सुरू होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने न्यायालयात सादर केले गेल्याने, शाळेची जागा मूळ मालकाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या संपूर्ण प्रकरणामागे बिल्डरचे मोठे रॅकेट असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा ताब्यात घेण्यासाठी बिल्डरने काही निवडक अधिकार्‍यांना हाताशी धरून शाळेचा पट शून्यावर आणण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता. प्रशासकीय राजवटीत बिल्डरचा हा डाव यशस्वीही होत आला होता; मात्र लोकप्रतिनिधींचे राज्य येताच चित्र पालटले.

टाईम्स स्पेशल

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली. न्यायालयात शाळेची बाजू योग्य प्रकारे मांडली गेली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याशी चर्चा केली आणि तातडीने उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना दिल्या. केवळ कायदेशीर लढाईवर न थांबता मुरकर यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला. या मोहिमेत सीईओ, जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षा आणि स्थायी समिती सदस्यांची मोलाची साथ लाभली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचे उद्ध्वस्त झालेले स्वच्छतागृह पुन्हा बांधण्यात आले आणि दोन सुसज्ज वर्गखोल्या तयार केल्या गेल्या. स्थानिक मुलांना घराशेजारीच शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने आज येथे २३ मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत. उच्च न्यायालयात अद्याप हा विषय प्रलंबित असला तरी, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता निकाल आपल्याच बाजूने लागेल आणि ही शाळा पुन्हा आदर्शवत ठरेल, असा ठाम विश्वास नंदकुमार मुरकर यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg