loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेच्या इशाऱ्यानंतर आठ दिवसांतच कुंभार्ली घाटातील खड्डे भरण्यास सुरुवात!

चिपळूण, (प्रतिनिधी) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कुंभार्ली घाटातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच संबंधित यंत्रणा कामाला लागली असून, घाटातील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावर प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात खासगी वाहने, प्रवासी वाहने तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, घाटातील अवघड वळणांवर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना विशेषतः छोट्या चारचाकी वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनांचेही नुकसान होत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या परजिल्ह्यातील ठेकेदाराकडून खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्यालगत संरक्षण भिंती उभारण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र होते. प्रवासी आणि वाहनचालकांकडून वारंवार खड्डे दुरुस्तीची मागणी केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह सुमारे आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता श्री. पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी कुंभार्ली घाटातील खड्ड्यांची परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसांच्या आत खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले नाही, तर संबंधित ठेकेदाराला काम करू दिले जाणार नाही. तसेच महामार्ग विभागाच्या कार्यालयातही कामकाज करणे अवघड होईल, असा सज्जड इशारा राजू खेतले यांनी दिला होता.

टाईम्स स्पेशल

या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देत घाटातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता प्रत्यक्ष खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनसेने जाहीर केलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याबद्दल राजू खेतले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. पाटील यांचे आभार मानले आहेत.दरम्यान, केवळ खड्डे बुजविण्यापुरतीच ही दुरुस्ती मर्यादित न राहता संपूर्ण कामाच्या दर्जाकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कुंभार्ली घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असतानाही त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ठेकेदाराकडून सुरू असलेल्या कामावर महामार्ग विभागाने नियमित देखरेख ठेवावी आणि दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणीही राजू खेतले यांनी केली आहे. आठ दिवसांच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात झाली असली, तरी कुंभार्ली घाटातील रस्ते खरोखरच सुरक्षित आणि खड्डेमुक्त होतात का, याकडे आता वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg