loader
Breaking News
Breaking News
Foto

३५० वर्षांची अखंड परंपरा जपत कोटकामतेत संस्थानिक थाटाचा शारदीय नवरात्रोत्सव

देवगड (प्रतिनिधी) - सुमारे साडेतीनशे वर्षांची अखंड धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते येथे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव संस्थानिक थाटात मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या उत्सवात पारंपरिक धार्मिक विधींसोबत शास्त्रीय संगीत, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना अनुभवता येणार आहे. कोटकामतेच्या श्री देवी भगवती संस्थानच्या नवरात्रोत्सवाला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली संस्थानिक शिस्त, धार्मिक परंपरा आणि भक्तिभाव यांचा अनोखा संगम या उत्सवात पाहायला मिळतो. त्यामुळे सिंधुदुर्गासह परिसरातील भाविकांसाठी हा नवरात्रोत्सव श्रद्धेचे विशेष केंद्र ठरतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. १५ ऑक्टोबरला ललिता पंचमी, तर १९ ऑक्टोबरला अष्टमीनिमित्त ताटाची पूजा होणार आहे. नवमीच्या दिवशी पारंपरिक होमहवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २१ ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त संस्थानिक थाटात पारंपरिक सोने लुटण्याचा सोहळा पार पडणार आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नामांकित कलाकारांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या बैठका रंगणार आहेत. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामांकित बुवांची सुश्राव्य भजने भाविकांना ऐकता येणार आहेत. त्यानंतर प्रवचन, आरती, पालखी प्रदक्षिणा, समस्त भाविकांचे दरबारी स्वागत व पान-सुपारी, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

या उत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे रात्री १२ वाजता होणारा श्रींचा अवसरी संचार. श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक वातावरणाने भारलेला हा पारंपरिक सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोटकामते येथे भक्ती, अध्यात्म, संगीत आणि शेकडो वर्षांची परंपरा यांचा मनोहारी संगम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात आई श्री देवी भगवतीच्या दर्शनासाठी आणि उत्सवाचा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळ, मानकरी, देवसेवक व समस्त ग्रामस्थ, इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg