loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेचे पाणीटंचाई नियोजन आतापासून करा; महेंद्र जाधव यांची मागणी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असलेल्या दहा गावांना मार्च-एप्रिलमध्ये नव्हे, तर यंदा जानेवारी-फेब्रुवारी २०२७ पासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट न पाहता आतापासूनच पाणीटंचाईचे नियोजन करावे, अशी मागणी उमरे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र जाधव यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेचा मुख्य आधार असलेल्या तेलेवाडी पाझर तलावाला गेल्या चार वर्षांपासून गळती लागलेली आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे टिकून राहत नाही. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. गेल्या काही वर्षांत साधारण मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत होती. मात्र, चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा संकट दोन महिने आधीच दारात येण्याची शक्यता आहे. उमरे, कळंबस्ते, भीमनगर, मळदेवाडी, फणसवणे, कसबा, अंत्रवली, कोंड उमरे आदी गावांसह योजनेवर अवलंबून असलेल्या दहा गावांना पाणीटंचाईचा फटका बसतो. टंचाईच्या काळात तीन-चार दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा केला जातो; मात्र तोही अत्यल्प असल्याने ग्रामस्थांची तहान भागत नाही.

टाईम्स स्पेशल

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा किती आहे, तो किती काळ पुरणार आहे, टँकरची गरज किती भासणार आहे, पर्यायी जलस्रोत कोणते उपलब्ध आहेत, याचा गावनिहाय कृती आराखडा आतापासून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने ऐनवेळी टँकर सुरू करण्याऐवजी आतापासूनच नियोजन करावे. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महेंद्र जाधव यांच्यासह दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. गळतीच्या तलावामुळे दरवर्षी दहा गावांची तहान भागविण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत असेल, तर कोट्यवधींच्या आराखड्यांचा उपयोग काय? असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg