loader
Breaking News
Breaking News
Foto

सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा मुख्य उपाय आहे" - पोलिस निरीक्षक महेश तोरसकर

दापोली (प्रतिनिधी) : सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा मुख्य उपाय आहे, असा मोलाचा संदेश दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पाजपंढरी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना दिला. दापोली तालुक्यातील पाजपंढरी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक मच्छीमार समाज वस्तीच्या लोकसंख्येचे गाव आहे. अशा या पाजपंढरी गावातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती पाजपंढरी आणि दापोली पोलीस ठाणे दापोली यांच्या संयुक्त विदयमाने रायसिंग फ्लॉवर्स व सायबर क्राईम मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे प्रमुख मार्गदर्शक वक्ते असलेल्या या कार्यक्रमाला पाजपंढरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र चोगले तसेच तंटामुक्ती समिती सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पावसे, पाणी पुरवठा अध्यक्ष पंढरीनाथ चोगले, श्रीराम हायस्कूल मुख्याध्यापक अर्जुन घुले, जि. प. मराठी शाळा पाज पंढरीच्या मुख्याध्यापिका स्नेहल शेटये, पाजपंढरीचे पोलीस पाटील जनार्दन पावसे आदी प्रमुख मान्यवरांसह गावातील स्थानिक नागरिक त्याचबरोबर जि. प. मराठी शाळा पाजपंढरी व श्रीराम हायस्कूल पाजपंढरी शाळेतील विद्यार्थी व विदयार्थिनी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी आपल्या ओघवत्या शैलित विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणांची फसवणूक होऊ नये, या उद्देशाने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरताना अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. आपले वैयक्तिक फोटो आणि माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक करू नये. तसेच कोणत्याही बँक खात्याची माहिती, ओटीपी, किंवा एटीएम पिन कोणासोबतही शेअर करू नये. ऑनलाईन गेमिंग आणि लॉटरीच्या आमिषाला बळी पडू नये. त्याचप्रमाणे सायबर फसवणूक किंवा छळवणूक झाल्यास घाबरून न जाता तात्काळ पालकांना सांगावे आणि १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. असे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

तर ’रायसिंग फ्लॉवर्स’ उपक्रम व महिला सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठीचा हा उपक्रम महत्वाचा असल्याचे सांगत शाळा-कॉलेजच्या परिसरात छेडछाड किंवा त्रास देणार्‍या रोडरोमियोंना आळा घालण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. मुलींनी कोणत्याही त्रासाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. एकुणच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी विद्यार्थ्यांना सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा मुख्य उपाय आहे, असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत सुर्वे यांनी केले तर प्रस्तावना दिगंबर पावसे यांनी केली. त्याचप्रमाणे आभार तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र चोगले यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg