loader
Breaking News
Breaking News
Foto

कंत्राटी पद्धतीविरोधातील २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित; २६ ऑक्टोबरला खेडमध्ये जनआंदोलन

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धत रद्द करून कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती आणि शासकीय रिक्त पदांची नियमित भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड प्रांत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देत हे जनआंदोलन आता सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी दिली. यासंदर्भात संघटनेच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, आंदोलन स्थगित केले असले तरी संघटनेने आपल्या मागण्या कायम ठेवल्या आहेत. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी, कंत्राटी पद्धत बंद व्हावी व आउटसोर्सिंग पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना भेडसावणारी असुरक्षितता, शासकीय रिक्त पदांची रखडलेली भरती आणि बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जनआंदोलन करण्यात येणार आहे. कंत्राटी व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुरक्षितता मिळावी, रिक्त पदांची पारदर्शक भरती सुरू करावी, पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवेला न्याय मिळावा आणि बेरोजगार युवकांसाठी ठोस रोजगारनिर्मितीचे धोरण जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

या मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. आता २६ ऑक्टोबर रोजी खेड प्रांत कार्यालयासमोर शांततामय आणि लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. "मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील. कंत्राटीकरणाच्या असुरक्षिततेविरोधात आणि रोजगाराच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार," असा निर्धार संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी व्यक्त केला. युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या या आंदोलनाकडे आता २६ ऑक्टोबर रोजी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg