loader
Breaking News
Breaking News
Foto

बंधाऱ्याच्या उर्वरित कामाला आजपासून सुरुवात; पाणी अडविण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा, झरेबांबरमध्ये वनराई बंधाऱ्यांची कामेही युद्धपातळीवर

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : तिलारी कालव्याचे पाणी १ ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर झरेबांबर-काजुळवाडी येथील भंडारा नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणी अडविण्याच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याच्या पाणी अडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित कामाला आज, १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती झरेबांबरचे सरपंच अनिल शेटकर यांनी दिली. गतवर्षी भंडारा नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील आंबा, काजू तसेच अन्य बागायती क्षेत्राला पाण्याचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र तिलारी कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता असल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत सरपंच अनिल शेटकर यांनी सांगितले की, “बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असले तरी पाणी अडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झालेले नाही. १ ऑक्टोबरपासून उर्वरित कामाला सुरुवात केली जाईल. तसेच बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.” दरम्यान, झरेबांबर गावातील अन्य ठिकाणीही वनराई बंधारे उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही ठिकाणची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ठिकाणी कामे सुरू आहेत. पावसाचे पाणी अडवून त्याचा शेती व बागायतीसाठी उपयोग व्हावा आणि आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई कमी व्हावी, या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

टाईम्स स्पेशल

तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे १ ऑक्टोबरपासून सुमारे तीन महिने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारे व वनराई बंधाऱ्यांमधील पाणीसाठा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्यात पाणी साठविण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यावर ग्रामपंचायतीचा भर असल्याचे सरपंच शेटकर यांनी स्पष्ट केले. सरपंच अनिल शेटकर म्हणाले, “गावातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बंधाऱ्याचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. बंधाऱ्याच्या उर्वरित कामासह गावातील अन्य ठिकाणी सुरू असलेली वनराई बंधाऱ्यांची कामेही पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे. काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करणार नाही.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg