loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात; इमारतीची दुरावस्था, रुग्णाच्या हिताची महालॅब बंद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र हे या पंचक्रोशीतील रुग्णासाठी अत्यंत सोयीचे आणि उपयुक्त ठरले आहे. मात्र सध्या हे आरोग्यकेंद्र अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब जागोजागी पडून इमारत धोकादायक बनली आहे. येथील रुग्णाच्या अनेक तपासण्या मोफत होणारी इथली महालैब ही १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतून नाराजी व्यक्त होत आहे. कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र हे कडवई, तुरळ, चिखली, रांगव, शेनवडे, मासरंग येथील ग्रामस्थांना वैदयकीय सेवेसाठी अत्यंत सोयीचे आणि उपयुक्त असल्याचे दिसून येते. सध्या येथे असणारे वैदयकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने येथे शेकडो रुग्ण नेहमी सेवा घेत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोफत उपचार होत असल्याने येथील सर्वसामान्य रुग्णाचा आर्थिक भर कमी होत आहे. या आरोग्य उपकेंद्रात रुग्णाच्या मोफत तपासण्या करण्यासाठी शासनाच्या वतीने महालॅब सुरू करण्यात आले. बाहेर हजारो रुपये खर्च करून होणार्‍या तपासण्या येथे मोफत होत होत्या. त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळही वाचत होता. पण अचानक १ नोव्हेंबर पासून ही महालॅब बंद करण्यात आल्याचे समजते. ही लॅब अचानक बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे, यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाली असून इमारत धोकादायक बनली आहे. ठिकठिकाणी इमारतीचा स्लॅब कोसळून आतील सळ्या बाहेरून दिसत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. हा स्लॅब कधीही कोसळत असल्याने येथील कर्मचारी आणि रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

टाईम्स स्पेशल

काही वर्षांपूवी या इमारतीचे दुरुस्ती काम करण्यात आले होते, मात्र हे काम निकृष्ठ झाले असल्याचे त्यावेळी ग्रामस्थांनी उघडकीस आणले होते. इमारतीच्या अशा दुरावस्थेमुळे रुग्ण आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश निर्माण झाला आहे. आरोग्य उपकेंद्राच्या लॅब बंद झाली आहे हे वास्तव आहे. तसेच इमारतीचा स्लॅब वारंवार कोसळत असून यामुळे रुग्ण आणि कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे वैद्यकीय अधिकारी संतोष यादव यांनी सांगितले. या इमारतीवर गेल्या पाच वर्षात कोणताही निधी खर्च झालेला नाही. इमारत धोकादायक झाली असल्याने ती नव्याने बांधणे गरजेचे आहे. यासाठी आपण शासनाकडे तसा प्रस्ताव दिला आहे, असे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg