loader
Breaking News
Breaking News
Foto

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संगमेश्वरात जयघोष! राष्ट्रीय एकता रॅलीचे जंगी स्वागत, पोलीस अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - देशाची एकात्मता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देत मार्गक्रमण करणाऱ्या राष्ट्रीय एकता मोटारसायकल रॅलीचे गुरुवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. संगमेश्वरवासीयांच्या वतीने धामणी-गोळवली येथील हॉटेल सनराईज येथे सकाळी १० वाजता या रॅलीतील सहभागी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे उत्साहात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विविध राज्यांतील पोलीस दलांच्या एकत्रित उपस्थितीने परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक, गोवा, केरळ आणि लक्षद्वीप येथील पोलीस दलांचे अधिकारी व अंमलदार या उपक्रमात सहभागी झाले असून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्वागत समारंभाला रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (IPS) तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी उपस्थित होते. संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील, सरपंच, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होत रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विविध राज्यांतून आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे स्थानिकांनी आपुलकीने स्वागत केले. रॅलीतील सहभागींच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिकांचा हा आदरातिथ्यपूर्ण प्रतिसाद पाहून राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला संगमेश्वरवासीयांनी मनापासून साथ दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टाईम्स स्पेशल

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून देणारी ही रॅली केवळ मोटारसायकल संचलन नसून, देशातील विविध राज्यांमधील ऐक्य, समन्वय आणि बंधुभाव अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. भाषा, संस्कृती आणि भौगोलिक सीमा वेगवेगळ्या असल्या, तरी देशहिताची भावना सर्वांना एकत्र बांधते, हा संदेश या रॅलीतून अधोरेखित झाला. संगमेश्वरवासीयांनी केलेले जंगी स्वागत, पोलीस अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि सहभागी जवानांसाठी केलेली चहा-नाश्त्याची व्यवस्था यामुळे या कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. राष्ट्रीय एकात्मतेचा ध्वज उंचावत पुढे मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीच्या स्वागताने संगमेश्वरच्या भूमीत देशप्रेम, बंधुभाव आणि एकतेचा जागर अनुभवायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg