loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी नगरपरिषदेचा यशस्वी उपक्रम: महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड; महिला सक्षमीकरणाचा नवा इतिहास! श्रीमंत शुभदादेवी भोसले

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा सावंतवाडी नगरपरिषदेचा निर्णय आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील युवती व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध व्यावसायिक, तांत्रिक व नावीन्यपूर्ण प्रशिक्षण शिबिराचा दिमाखदार समारोप सोहळा नुकताच पार पडला. सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या महिला आता खऱ्या अर्थाने कुटुंबाचा बळकट आधार बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे श्रीमंत शुभदादेवी भोसले म्हणाल्या. राणीसाहेब श्रीमंत शुभदा देवी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात कौतुक करताना सांगितले की, सावंतवाडी नगरपरिषदेने महिलांना रोजगारक्षम बनविण्याचा घेतलेला निर्णय आज यशस्वी ठरला आहे. महिलांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. फॅशन डिझायनिंग, कॅटरिंग, कुकिंग तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविण्याचे हे प्रशिक्षण महिलांच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी मनोगतात सांगितले की, महिलांना सक्षम करण्याचा घेतलेला संकल्प आज पूर्णत्वास आल्याचे पाहून मन आनंदित झाले आहे. महिलांनी एकमेकींना सहकार्य करून व समजून घेऊन पुढे गेल्यास रोजगार निर्मितीमध्ये नक्कीच यश मिळेल. राजघराण्यातील संस्कारांची जोड आणि श्रीमंत शुभदादेवी भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन या वाटचालीस सतत लाभत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली भालेकर यांनी सांगितले की, महिला व युवतींच्या अंगात रोजगार निर्माण करण्याची प्रबळ हिंमत असल्यानेच हा उपक्रम हाती घेण्यात आला, जो आज यशस्वी ठरला आहे. हा उपक्रम महिलांच्या आगामी व्यावसायिक वाटचालीस दिशादर्शक ठरेल. जागृत समाज विकास संस्था, कोल्हापूरचे प्रशिक्षक संदीप पवार यांनी सांगितले की, गेल्या ३३ वर्षांपासून ते प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. उद्योगामध्ये आवश्यक असणारी सहनशीलता महिलांमध्ये उपजतच असते, त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुलभ झाले. या प्रशिक्षणातून महिलांना रोजगाराच्या नवीन आणि हक्काच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या साड्या नेसून एका आकर्षक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला, ज्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच कॅटरिंग आणि कुकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी स्वप्नजा चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोल्हापूरच्या जागृत विकास संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्या श्रीमंत शुभदादेवी भोसले, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली भालेकर व इतर उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला.​ या कार्यक्रमाला उद्यान समितीच्या सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका सौ. निलम नाईक, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, तसेच प्रशिक्षक सरकाश मुल्ला, सफिना बागवान, सारिका ठोंबरे, सपना चोडणकर आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसभापती सुनीता पेडणेकर यांनी मानले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी परवीन शेख यांनी प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg